दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
वसंतराव हाडाचे शेतकरी होते. मुख्यमंत्री असताना त्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या आवारात ते खाली जमिनीवर बसून झाडे लावत असत. त्यावर काही प्रयोग करत असत. बाहेर कुठेही दौरा असला तरी त्यांचे लक्ष शेतीवर असे. कुठे काही वेगळे चांगले दिसले की ते गाडीतून उतरून चौकशी करीत. संकरित ज्वारीचे पीक विक्रमी आल्यावर त्यांना वाटले, फळांचे उत्पादन वाढविण्यासाठीसुद्धा असे प्रयोग करता येतील. महाराष्ट्रात नाशिक भागात द्राक्षाचे उत्पादन होत असे. वसंतरावांनी प्रोत्साहन दिल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेऊ लागले. पुसदमध्ये देखील अनेक शेतकरी त्यांच्या जमिनीवर द्राक्षाची बाग फुलवू लागले. ‘पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा’चे कुलगुरू डॉक्टर गोपाळकृष्णन हे द्राक्षतज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे मार्गदर्शन घेऊन विदर्भात शेतकरी द्राक्षाची बाग फुलवू लागले. ‘अनाबशाही’ या नावाने ही द्राक्षे प्रसिद्ध झाली. मोठ्या प्रमाणावर द्राक्षे पिकू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला.
वसंतरावांचे आवडते वाक्य होते - ‘शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे’. कारखानदार आपले भांडवल, मालाचे उत्पादन करताना झालेला मेहनताना, व्याज व नफा यांचा विचार करून भाव ठरवतो. तसेच शेतकऱ्यांनी केले पाहिजे, म्हणजे शेती व्यवसाय तोट्यात जाणार नाही. वसंतरावांच्या कारकीर्दीत विक्रमी धान्य व फळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतीनिष्ठ’ ,’ शेतीभूषण’ अश्या पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वेगवेगळ्या फळांवर ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियासुद्धा शेतकऱ्यांनी शिकून घेऊन कराव्यात, असे त्यांचे मत होते. यातून शेतकरी स्वावलंबी तर होईलच, पण सधनही होईल. शेतकरी सधन झाला तर त्यांची मुले बाळे शिक्षण घेऊ शकतील, असे वसंतराव म्हणत.
एका ठिकाणी दौरा करीत असताना वसंतरावांना एका शेतात उत्तम मिरच्या दिसल्या. वसंतरावांनी लगेच थांबून त्याचे बी घेऊन शेतकऱ्यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यात सिरोंचा येथे एकदा शेतकरी मेळावा आयोजित केला होता. चर्चा चालू होती तेव्हा खोडसाळपणाने वसंतरावांना कोणीतरी विचारले, ”पलीकडच्या तीरावरील आंध्रची शेती पहा. सिरोंचा आंध्र प्रदेशात असायला हवे होते.” वसंतराव ताडकन म्हणाले, “तुम्हाला काय पाहिजे?” प्रश्न विचारणाऱ्या माणसाने शंभर कूपनलिका मागितल्या. वसंतरावांनी लगोलग १०० कूपनलिका संमत केल्या. एवढेच नव्हे तर इतर सोयीसुद्धा सिरोंचा गावाला उपलब्ध करून दिल्या.
पुसद येथील वसंतरावांचे स्थानिक राजकारणातील एक सक्रिय कार्यकर्ते लक्ष्मणराव जाधव हे पहेलवान होते. वसंतरावांनी त्यांच्या ताकदीचा उपयोग शेतीत करून घेतला. वसंतरावांच्या सहवासाने लक्ष्मणरावांच्या मनातसुद्धा शेतीबद्दल प्रेम उत्पन्न झाले व त्यांनी आपली शक्ती शेतीत उपयोगात आणली. लक्ष्मणरावांनी वसंतरावांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या शेतात संकरित ज्वारीची लागवड केली. पुढे वसंतराव जेव्हा पुसदला आले, तेव्हा ते लक्ष्मणरावांना आवर्जून भेटले व त्यांनी त्यांच्याजवळ ज्वारीचे पीक कसे आले? रोपटी नीट वाढली ना? इत्यादी प्रश्न विचारले. शेतीसंबंधी काहीही विषय किंवा मुद्दा असला की वसंतरावांचा उत्साह बघण्याजोगा असे.
आपल्या मातीवरचे त्यांचे प्रेम, त्यांची आस्था नेहमीच भरभरून वाहत असे आणि ते त्यांच्या बोलण्यातून दिसून येई.
अशीच गोष्ट केळीच्या उत्पादनाबाबत घडली. वसंतराव मुख्यमंत्री असताना त्यांनी लक्ष्मणरावांच्या शेतात ‘बसराई अर्धापुरी’ जातीच्या केळीचे बेणे आणून दिले. याबरोबर केळीची लागवड कशी करायची याची पुस्तिका पण दिली. लक्ष्मणरावांनी पुस्तिकेत दिल्याप्रमाणे केळीची लागवड केली व त्यावर्षी केळीचे विक्रमी उत्पादन त्यांच्या शेतात आले. यानंतर त्यांनी हिवरा येथील तेव्हाचे प्रगत शेतकरी एकनाथराव कदम यांच्याकडून ‘हनुमान’ जातीच्या केळीचे बेणे आणले. ते बेणे पण त्यांनी वसंतरावांनी सांगितलेल्या तंत्राप्रमाणे शेतात लावले आणि आश्चर्य असे की या केळीचा प्रत्येक घड ७० ते ७२ किलोचा होता.
केळीचे प्रचंड उत्पादन पाहून वसंतरावांनी पुसद जवळील सेलू येथील शेतातून काही मिरचीची रोपे लक्ष्मणरावांना दिली. त्या काळात मिरचीला जास्त भाव नव्हता. पण लक्ष्मणरावांनी ती मिरचीची रोपे आपल्या शेतात लावली व दर एकरी एक लाख ३५ हजार रुपयांची मिरची काढली. लक्ष्मणराव नेहमी वसंतरावांच्या सल्ल्यानुसार शेतीत प्रयोग करीत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वसंतराव त्यांच्या रोजच्या व्यापातून शेतीसाठी वेळ काढत. यावरूनच त्यांचे शेतीवरचे प्रेम, शेतकऱ्यांबद्दलची आस्था दिसून येते. यानंतर वसंतरावांनी कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड यांना लक्ष्मणरावांची शेती पाहायला पाठवून दिले. लक्ष्मणरावांनी आपल्या शेतातून जे विक्रमी असे केळीचे उत्पादन घेतले, त्याबद्दल वर्तमानपत्रात छापून आले. दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांनी ही बातमी दाखवली. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष्मणरावांचे नाव झाले. प्रख्यात उद्योजक किर्लोस्कर यांनी लक्ष्मणरावांशी संवाद साधून त्यांची कृषी औद्योगिक प्रकल्पासंबंधीची मते जाणून घेतली. ‘विको वज्रदंती’चे मालक श्री पेंढारकर तर या बातमीने इतके उत्कंठित झाले की त्यांनी सरळ पुसद गाव गाठले व ते लक्ष्मणराव जाधव यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी लक्ष्मणरावांची भेट घेतली व केळीच्या बागेची नीट पाहणी केली.
यानंतर श्री पेंढारकर लक्ष्मणरावांना आपल्या गाडीत बसवून नागपूरला घेऊन गेले. नागपूरला त्यांच्या शेतात श्री पेंढारकरांनी केळी लावली होती. या झाडांची देखभाल कशी करायची, त्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल त्यांनी लक्ष्मणरावांकडे सल्ला मागितला. लक्ष्मणराव म्हणाले, “मी वसंतरावांच्या मार्गदर्शनानुसार शेती करतो. यात माझे श्रेय काही नाही.” यानंतर पेंढारकर लक्ष्मणरावांना घेऊन परभणी, अकोला, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी गेले. या सर्व ठिकाणी त्यांनी लक्ष्मणरावांना सांगितले, “केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही थोडे मार्गदर्शन करा, म्हणजे तेसुद्धा केळ्याचे विक्रमी उत्पादन करू शकतील.” अर्थात या ठिकाणीसुद्धा लक्ष्मणरावांनी त्यांच्या यशाचे श्रेय वसंतराव नाईक यांचे मार्गदर्शन व सहकार्य यालाच दिले.
वसंतराव शेतकऱ्यांची भरभराट कशी होईल, त्यांची स्थिती कशी सुधारेल, यावरच कायम विचार करीत. शेतकऱ्याला दुष्काळाच्या भीषण दाढेतून बाहेर कसे काढता येईल, राज्याचा बळीराजा सुखी कसा होईल, याच विवंचनेत ते दिवस रात्र असत.
शेतकऱ्यांचा एवढा विचार करणारा कोणी मुख्यमंत्री झाला नाही व होणार नाही.
वसंतराव मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला कोणीही शेतकरी कधीही येऊ शकत असे. वसंतरावसुद्धा त्याला भेटून त्याच्या शेतीची विचारपूस अत्यंत आस्थेने करीत असत. त्यांचा महाराष्ट्रातील कुठल्याही भागाचा दौरा चालू असे, तेव्हा रस्त्यात कोणी शेतकरी दिसला किंवा कोणाचे शेत हिरवेगार बहरलेले वेगळे दिसले की गाडी थांबून त्या शेतकऱ्याला वसंतराव भेटत असत. असे हे शेतकऱ्यांचे खंदे समर्थक मुख्यमंत्री.
मुख्यमंत्री म्हणून इतर जबाबदारी पार पाडत असताना कृषी क्षेत्रात वसंतरावांनी अनेक प्रयोग केले, परिश्रम घेतले. त्यामुळेच महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत पुढे गेला. त्यांच्या सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी प्रगती करू शकले.
सुप्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे म्हणतात, “महाराष्ट्रातील शेतीला मुख्य गरज आहे पाण्याची”. पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी वसंतरावांनी मनात काही कल्पना निश्चित केल्या होत्या. ‘हाताला काम व शेतीला पाणी’ हे त्यांचे सूत्र होते. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वसंतरावांनी कृषी, सहकार, महसूल इत्यादी खात्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली. पण त्यांचे मन मात्र रमले कृषी खात्यातच. वसंतरावांचे व या भूमातेचे असे काही नाते होते, अशी जवळीक होती की त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी व्हायचे. अन्नधान्य उत्पादनाच्या बैठका असोत किंवा मुख्यमंत्र्यांच्या, वसंतराव ‘शेती’ हा विषय निघाला की भरभरून बोलत, पोटतिडकीने बोलत, की ऐकणारा भान हरपून ऐकत राही.