दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
हरितक्रांतीचे प्रणेते
वसंतराव म्हणजे शेतकऱ्यांचे सच्चे मित्र. त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी फक्त शेतकरी व शेतीच असायची. जरी ते आमदार, खासदार, उपमंत्री, मंत्री व शेवटी मुख्यमंत्री झाले तरी त्यांचे मन शेतीच्या बांधावरच रमायचे. मुख्यमंत्र्यांच्या कचेरीत आरामशीर खुर्चीत जसे ते सहजतेने बसायचे, तितक्याच सहजतेने ते एखाद्या शेतकऱ्याच्या घरी धान्याच्या पोत्यावर बसायचे. त्यांचा पिंडच शेतकऱ्याचा होता. त्यांचे मन नेहमी काळ्या मातीतच रमायचे. त्यांच्या मते आपला देश कृषीप्रधान आहे, म्हणून आपल्या देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असायला हवा. आपण फक्त म्हणतो ‘शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे’, पण ते फक्त बोलण्यापुरतेच. भारतात शेतकरी कायम गरीब, कर्जबाजारी व दुःखी असतो. हे चित्र बदलले पाहिजे. शेतकऱ्यात आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे. शेतकरी सुखी झाला पाहिजे’ हे त्यांच्या मनात पक्के होते.
त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत शेतीविषयक अनेक सुधारणा घडवून आणल्या. म्हणूनच १ जुलै ही त्यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय १९८९ साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांनी घेतला. तेव्हापासून शासकीय स्तरावर हा दिवस साजरा होतो. तर ‘कृषी दिन’ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची अभिनव प्रथा २०११ पासून सुरू केली.
१९६५ मध्ये लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा दिली. याच सुमारास महाराष्ट्र अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता. महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अन्नधान्याची टंचाई होती. महाराष्ट्रभर आंदोलने चालू होती. मुंबईत गिरणी कामगारांचे आंदोलन, महिलांचे आंदोलन, पाण्यासाठी आंदोलन, चारही बाजूनी आंदोलने चालू होती. पण या सर्वाना वसंतरावांनी शांतपणे संयमाने हाताळले. त्यांनी एकदा शनिवारवाडा (पुणे) येथे एक सभा घेतली. या सभेत त्यांनी घोषणा केली, “महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी मी प्रयत्न करीन, आणि जर मी यशस्वी झालो नाही तर मला फाशी द्या.” त्यांनी शेतकऱ्यांना शेतात ‘संकरित’ ज्वारी पिकवायला सांगितली, आणि त्या ज्वारीचे भरघोस पीक आले. या संकरित ज्वारीच्या विरोधात विरोधी पक्षाने अतिरेकी प्रचार केला की ही ज्वारी खाल्ली तर वंध्यत्व येते. पण असे काही झाले नाही. त्यामुळे वसंतरावांनी ‘महाबीज’ची स्थापना केली. त्यावेळी भारताची अन्नधान्याची निकड भागविण्यासाठी अमेरिकेतून ‘पी एल ८४’ हा गहू येत होता. हा गहू अत्यंत निकृष्ट जातीचा होता. अमेरिकेत तो गुरांना खायला दिला जायचा. वसंतरावांनी निर्धार केला की आपण ही परावलंबिता दूर करायची. या सुमारास वसंतरावांनी महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ महाबीज ची स्थापना केली. या महामंडळाचे काम प्रत्यक्षपणे १९७६ ला सुरू झाले. परंतु वसंतरावांच्या कारकीर्दीत त्याची आर्थिक तरतूद, ढाचा इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात आली होती. त्या काळात काँग्रेस हा जरी भक्कम पक्ष होता, तरी विरोधी पक्ष सुद्धा मजबूत होता. विरोधी पक्षांनी वसंतरावांना वारंवार प्रतिकार केला, पण वसंतरावांनी आपली सभ्यता कधीही सोडली नाही. त्यांनी कोणाबद्दलही अपशब्द उच्चारला नाही की कोणाचा अपमान केला नाही. असा अत्यंत सुसंस्कारित, संयमी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता. वसंतराव आदर्श नेता, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू व आदर्श मुख्यमंत्री होते.
वसंतरावांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारीसुद्धा तगडे होते. त्यांनी वसंतरावांना नेहमीच आधार दिला. म्हणूनच कोयनेचा भूकंप झाला तेव्हा दहा हजार घरे बाळासाहेब देसाई यांच्या सहकार्याने उभी केली गेली. ज्वारीची किंमत बाजारात कमी होत असताना सरकारने ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवले. त्यावेळी तल्यारखान ‘पुरवठा’ मंत्री होते व ‘अन्न नागरी पुरवठा मंत्री’ हरिभाऊ वर्तक होते. कापूस एकाधिकार योजना (१९७१), रोजगार हमी योजना (१९७२), अश्या अनेक योजना वसंतरावांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने उत्तमरित्या राबवल्या.
जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आली पाहिजे, यासाठी जमीन हिरवीगार व्हावी, भरपूर पीक यावे, पाण्याची टंचाई किंवा पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे, यासाठी वसंतरावांनी जवळपास ३६ धरणांची निर्मिती केली.
१९७२ च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्र होरपळून निघाला होता. उपासमारीमुळे गरिबांचे हाल होत होते. जवस, मिलो अश्या प्रकारचे धान्य खाऊन दिवस काढण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अश्यावेळी नाईक साहेबांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास दिला, आधार दिला. महाराष्ट्रातील तमाम जनता पावसाकडे डोळे लावून बसली होती. कारण पाणी कुठून आणायचे हा मोठा प्रश्न होता. शेवटी एक दिवस महाबळेश्वरला जोरदार पाऊस सुरू झाला. ही बातमी समजल्यावर वसंतरावांनी खिशात हात घालून शंभर रुपयाची नोट काढली आणि आपल्या सहकार्याला पेढे आणायला सांगितले.
दरवर्षी जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊस आला की त्यावेळेला नाईक साहेब पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करीत असत.
ज्वारीप्रमाणे कापसामध्ये पण वसंतरावांनी नवीन बियाणे आणले. आधी जो कापूस पिकवला जायचा त्याचे उत्पादन कमी होते. नवीन बीज म्हणजे ‘एचफोर बीज’ आणल्यावर कापसाचे उत्पादनसुध्दा वाढले.
१९६० ते १९७० या दशकात महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये क्रांती घडून आली. सहकारी साखर कारखान्यांचा वारसा महाराष्ट्राला आधीच लाभला होता. परंतु १९६०–६१ मध्ये महाराष्ट्रात जेमतेम १५ ते २० साखर कारखाने अस्तित्वात होते. १९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत ही संख्या अनेक पटींनी वाढून १०० च्या जवळ पोहोचली. हे कारखाने जवळपासच्या परिसराच्या विकासाची केंद्रे बनले.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे. १९६० ते १९७० या दशकात कापूस उत्पादन आणि प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले. शासकीय उपाययोजना, तांत्रिक प्रगती आणि शेतकऱ्यांची मेहनत यांच्या सहाय्याने कृषी आणि प्रक्रिया व्यवसायाच्या सहकार्याने उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ झाली, उत्पादन खर्च कमी झाला आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळू लागला. यामुळे कापूस उत्पादन क्षेत्रात भरभराट दिसून आली.
श्वेतक्रांती
‘शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे’ हे वसंतरावांचे ठाम मत होते. शेतकऱ्याने शेती बरोबर जोड व्यवसाय केला तर तो फायदेशीर होतो. हा पूरक उद्योग कुठलाही असो. कुकुटपालन, शेळीपालन, गाई पाळणे, मेंढ्या पाळणे, मध उत्पादन इत्यादी. महाराष्ट्रातील अपेक्षित दुधाची गरज भागविण्यासाठी दूध उत्पादन वाढवणे गरजेचे होते. यासाठी वसंतरावांनी त्यांच्या कालावधीत ‘संकरित’ गाईंचा कार्यक्रम राबविला. येथे त्यांची दूरदृष्टी दिसून येते. या कामात त्यांना शंकरराव चव्हाण, शरद पवार व वसंत दादा पाटील यांची मोलाची मदत मिळाली. सुरुवातीला ‘पशुसंवर्धन खात्या’ने या योजनेला विरोध केला. वसंतरावांनी लोकांना पटवून दिले की गायींच्या पचनेंद्रियाची रचना अशी आहे की त्यामुळे चारा व पशुखाद्य यांचे रक्तात व दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त आहे. शिवाय संकरित गाईंचा भाकड कालावधी म्हशींपेक्षा कमी असतो, यासाठी संकरित गाई जास्त फायदेशीर आहेत. याचा अर्थ म्हशींच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यांच्या मते प्रगत तंत्रज्ञान ज्याप्रमाणे आपण उद्योग व्यवसायात, संरक्षण खात्यात, किंवा वैद्यकीय व्यवसायात वापरतो, त्याप्रमाणे कृषी क्षेत्र, दुग्ध उत्पादन क्षेत्र इत्यादी ठिकाणी सुद्धा प्रगत तंत्रज्ञान व विज्ञान वापरले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्य व दुधाच्या मागणीनुसार आपले उत्पन्न सुद्धा वाढले पाहिजे, याच उद्देशाने त्यांनी ‘राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन संस्थे’चे तज्ञ संचालक डॉक्टर सुंदरेशन यांच्या ‘गाय किंवा म्हैस’ या प्रबंधाचा उपयोग करून घेतला. त्या काळात शेतीप्रमाणे दुग्ध व्यवसाय पण तोट्यात चालला होता. वसंतरावांनी संकरित गाईंचा जो क्रांतिकारी निर्णय घेतला, त्यामुळे दुग्ध व्यवसायाला योग्य वातावरण निर्माण केले गेले. शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करण्यासाठी योग्य ते शिक्षण घेतले पाहिजे असे ते म्हणत. या शिक्षणात गाईंचा आहार कसा असावा, त्यांचे संगोपन कसे करावे, त्यांना रोग होऊ नये म्हणून काय करावे, स्वच्छता कशी राखावी, अश्या अनेक गोष्टी समाविष्ट असाव्यात.
महाराष्ट्रातला दुग्ध व्यवसाय गुजरातमधील आणंदच्या दुधाच्या भरवशावर चालला होता. महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला चालना द्यायची असेल तर गाय व म्हैस यांच्या दुधाला सारखाच भाव द्यावा लागेल, असा प्रस्ताव मांडला गेला. यावर प्रचंड मोठा वादंग झाला.