दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर काही मोजक्या नेत्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव आवर्जून घेतले जाते. जवळपास साडेअकरा वर्षांचा दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे ते महाराष्ट्राचे एकमेव नेते होते. त्यांचा हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात 'सुवर्णयुग' म्हणून ओळखला जातो. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमांमुळे महाराष्ट्राने कृषी, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली. वसंतराव हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर एक कृषीप्रेमी समाजसुधारक, दूरदृष्टीचे प्रशासक आणि लोकशाहीचे सच्चे पाईक होते. त्यांच्या जयंतीचा दिवस, १ जुलै, महाराष्ट्रात 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. हेच त्यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे प्रतीक आहे.
वसंतराव यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळील गहुली गावी झाला. ते बंजारा जमातीत जन्मले होते. हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या विमुक्त जमातींमध्ये मोडत होता आणि इंग्रजांनी १८७१ मध्ये त्यांच्यावर 'गुन्हेगार जमातींचा काळा कायदा' लादला होता. अश्या प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत वसंतराव यांचे वडील, फुलसिंग नाईक, जे बंजारा तांड्याचे प्रमुख (नायक) होते, त्यांनी समाजात शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून, फुलसिंग नाईकांनी आपल्या दोन्ही मुलांना – राजूसिंग (मोठे बाबा) आणि हाजूसिंग (वसंतराव, छोटे बाबा) – शिक्षणासाठी शहरांमध्ये पाठवले. प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी वसंतरावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी नागपूर येथील नीलसिटी हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. मॉरिस कॉलेजमधून (आताचे वसंतराव नाईक कॉलेज) बी.ए. झाल्यानंतर, १९४० साली नागपूरच्या विधी महाविद्यालयातून एल.एल.बी.ची पदवी संपादन केली. वकील झाल्यावर त्यांनी पुसद येथे वकिली सुरू केली. वसंतरावांनी आपल्या वकिलीचा उपयोग गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. ते गरीब पक्षकारांकडून पैसे घेत नसत; उलट, त्यांच्या खिशातून तिकिटाचे पैसेही देत. लोकांना भांडणतंटे टाळून कोर्टकचेऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ते देत.
त्यांच्या सामाजिक सुधारणावादी विचारांचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे वत्सला घाटे यांच्याशी झालेला त्यांचा आंतरजातीय विवाह. वत्सलाताई एका सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबातील होत्या. बंजारा समाजातील वसंतरावांसोबत झालेल्या त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांतून तीव्र विरोध झाला. परंतु वसंतरावांच्या संयमी, प्रेमळ आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वामुळे हा विरोध हळूहळू मावळला. त्यांनी बंजारा समाजातील अंधश्रद्धा, दारूचे व्यसन आणि स्त्रियांच्या पारंपरिक वेशभूषेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. ‘शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे’ या विचारावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच त्यांनी आदिवासी व भटक्या जमातीतील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केल्या. आश्रमशाळांमधून मुलांना मोफत भोजन, निवारा, शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य सुविधा पुरविल्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बंजारा समाजाला 'विमुक्त जाती'चे आरक्षण मिळाले आणि उच्च शिक्षण व सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे उघडले. म्हणूनच त्यांना 'भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाचे जनक' म्हणून ओळखले जाते.
वसंतरावांचा राजकीय प्रवास १९४२ च्या 'चले जाव' चळवळीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने सुरू झाला. ते गांधीजींच्या भाषणाने प्रभावित झाले होते. पुसद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि नंतर पुसदचे नगराध्यक्ष म्हणून, ऑक्टोबर १९४६ ते जानेवारी १९५२ या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी भरीव काम केले. त्यांनी 'बापू बालक मंदिर' ही प्राथमिक शाळा आणि 'ग्रेन मार्केट' उभारले, तसेच दलितांसाठी शाळा सुरू केली. त्यांच्या कार्यकाळातच, पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या सहकार्याने इंग्रजांनी बंजारा समाजावर लादलेला 'गुन्हेगार जमातींचा काळा कायदा' रद्द करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 'बंजारा सेवा संघा'ची स्थापना करून त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू, गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांशी भेट घेऊन हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द करण्यात आला आणि तो दिवस आता 'विमुक्त दिन' म्हणून साजरा केला जातो.
१९५२ मध्ये ते मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात 'महसूल खात्याचे उपमंत्री' बनले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी गुजरात आणि महाराष्ट्र मिळून 'विशाल द्विभाषिक राज्य' निर्माण झाल्यानंतर, त्यांनी सुरुवातीला अल्पकाळ 'सहकार मंत्री' म्हणून काम पाहिले आणि नंतर, १९५७ मध्ये, 'कृषीमंत्री' म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना अमलात आणल्या. विहीर खोदण्यासाठी अनुदान, पंप खरेदीसाठी तगाई योजना, प्रत्येक खेडेगावात वीज पोहोचवण्याची कार्यवाही, तलाव निर्मिती, 'पाणी अडवा – पाणी जिरवा' योजना यांचा या योजनांमध्ये समावेश होता. त्यांनी विनोबा भावे यांच्या 'भूदान चळवळी'त सक्रिय सहभाग घेतला.
५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतरावांनी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चीन-भारत युद्धानंतर पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावून घेतले. यातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत वसंतरावांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. १९६२ चे चीन-भारत युद्ध, कोयना भूकंप, अन्नधान्याचा तुटवडा, १९७२ चा भीषण दुष्काळ, महागाई आणि विविध आंदोलने त्यांनी शांतपणे आणि संयमाने हाताळली. 'महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जर मी यशस्वी झालो नाही, तर मला फाशी द्या' अशी प्रतिज्ञा त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यावर घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच महाराष्ट्रात हरितक्रांती घडून आली. 'महाबीज' (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) ची स्थापना, सिंचनाच्या विविध योजना, धरणांची निर्मिती, एच-४ कापसाचे बीज आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ – या चार कृषी विद्यापीठांची स्थापना – या साऱ्या त्यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची साक्ष देतात.
त्यांनी केवळ शेतीतच नव्हे, तर औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम केले. 'सत्तेचे विकेंद्रीकरण नाईक समिती'चे अध्यक्ष म्हणून त्यांनी 'पंचायत राज व्यवस्था' बळकट केली. बळवंतराव मेहता समितीच्या शिफारसी स्वीकारून, त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर लोकप्रतिनिधी असावा, अशी शिफारस केली. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना राजकारणात येण्याची संधी मिळाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक व प्रशासकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले. 'सिडको'ची स्थापना करून त्यांनी 'नवी मुंबई' आणि औरंगाबादच्या नियोजनबद्ध विकासाची मुहूर्तमेढ रोवली.
१९७२ चा भीषण दुष्काळ ही वसंतरावांच्या नेतृत्वाची खरी कसोटी होती. या कठीण काळात त्यांनी 'रोजगार हमी योजना' (रोहयो) अमलात आणली. 'प्रत्येक हाताला काम' या उद्दिष्टावर आधारित ही योजना त्यांनी राबवली. महाराष्ट्र ही अशी योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले. पुढे ही योजना देशभर 'जवाहर रोजगार हमी योजना' म्हणून ओळखली जाऊ लागली. या योजनेतून लाखो लोकांना काम मिळाल्यामुळे उपासमारीचे संकट टळले. विशेष म्हणजे, या योजनेसाठी निधी उभा करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विश्वासात घेतले. या योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघातही करण्यात आला. शेतीला पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी श्वेतक्रांती घडवून आणली. संकरित गाईंच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आणि दुग्धव्यवसायाला बळकटी दिली.
वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्याइतकेच प्रभावी होते. ते 'अजातशत्रू' म्हणून ओळखले जात. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे संबंध अत्यंत सौजन्यपूर्ण आणि मैत्रीपूर्ण होते. विरोधकही त्यांचे कौतुक करत असत. जांबुवंतराव धोटे, मृणाल गोरे, बापूसाहेब काळदाते आणि गणपतराव देशमुख यांसारख्या विरोधकांशी त्यांनी अत्यंत आदराने आणि सहानुभूतीने व्यवहार केला. त्यांच्या साधेपणा, मनमिळावूपणा आणि जमिनीशी असलेल्या घट्ट नाळेमुळे ते सर्वसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. मुख्यमंत्री असतानाही ते शेतकऱ्यांच्या घरी जायचे, त्यांच्या समस्या ऐकायचे आणि मदत करायचे. एका प्रसंगात ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एका खेडूताला स्वतःच्या काडेपेटीने विडी पेटवून दिली. त्यांच्या साधेपणाचे आणि सामान्य माणसाशी असलेल्या नात्याचे हे प्रतीक आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही आरोप करू शकले नाहीत. त्यांची कारकीर्द धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ होती.
१९७५ साली त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यांनी तो शांतचित्ताने स्वीकारला. त्यानंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेस पक्षाला देशभरात इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या धोरणांमुळे मोठा पराभव पत्करावा लागला असतानाही, वाशिम लोकसभा मतदारसंघातून वसंतराव भरघोस मतांनी निवडून आले. हे त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक होते. त्यांना उपराष्ट्रपतीपद आणि राज्यपालपद सुध्दा देऊ करण्यात आले, परंतु सत्तेची लालसा नसल्यामुळे त्यांनी ती पदे नम्रपणे नाकारली.
वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. विशेषतः बंजारा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना 'क्रांतिकारी' म्हटले, तर शरद पवार यांनी त्यांना 'आधुनिक, प्रगत महाराष्ट्राचा कळस चढवणारे नेते' असे संबोधले. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी देशाला 'रोजगार हमी योजना' सारखी कल्पना दिली. वसंतरावांनी ओसाड महाराष्ट्राला हिरवे स्वप्न दाखवले आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवले. त्यांचे जीवन आणि कार्य हे समर्पण, दूरदृष्टी आणि लोकसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे कार्य आजही तरुण पिढीला प्रेरणा देते. महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान खरोखरच अमोल आणि अविस्मरणीय आहे.