दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
१) विरोधकांशी वागणूक
वसंतराव म्हणजे सौजन्याचा मूर्तिमंत पुतळाच! ते अजातशत्रू होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे वागणे इतके सौजन्यपूर्ण असे, की विरोधक विरोध करायचे विसरून जात असत. मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला मंत्री, नागरिक, समाजसेवक, शेतकरी यांचा राबता असे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही विविध क्षेत्रातील लोक त्यांना भेटायला येत व ते प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करीत असत.
महाराष्ट्रात दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला भरते. असेच अधिवेशन भरले होते. अधिवेशनाला ‘सीमा प्रश्न’ चर्चेला आला होता. या प्रश्नावर वाद झाल्यामुळे सभागृहातील काही विरोधी पक्षातील लोकांनी सभात्याग केला व ते सभागृहाच्या बाहेर चटईवर जाऊन बसले. वसंतरावांना हे कळल्यावर ते बाहेर आले व त्यांनी प्रत्येकाचे नाव घेऊन त्यांना आत येऊन बसायला सांगितले. विरोधी पक्षातील लोक म्हणाले, “आमचे धरणे आहे. आम्ही आत येणार नाही.” वसंतराव म्हणाले, “ठीक आहे. मी तुमच्याबरोबर येथे बाहेर बसतो.” आणि ते खाली चटईवर बसले. गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने वसंतराव म्हणाले, “तुमचे धरणे आंदोलन आहे. उपोषण नाही.” असे म्हणून त्यांनी सर्वांसाठी खाणे व चहा मागविला. विरोधाची धार बोथट झाली. अश्याप्रकारे ते विरोधी पक्षाला दुय्यम वागणूक न देता त्यांच्याशी अत्यंत सौजन्याने, मैत्रीपूर्ण नात्याने वागत असत.
जांबुवंतराव धोटे हे वसंतरावांचे कट्टर विरोधक होते. ते नेहमी नाईक साहेबांवर मोठमोठ्याने बोलून टीका करीत. एक दिवस जाबुवंतरावांचा घसा बसला. त्यांना बोलता येईना. तेव्हा वसंतराव त्यांना म्हणाले, ”मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो.” जाबुवंतराव या गोष्टीला तयार नव्हते. तेव्हा वसंतराव म्हणाले, “जाबुवंतराव, आम्हाला परखड बोलणाऱ्या विरोधकांची अत्यंत गरज आहे. तुम्हाला बोलता आलेच पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, माझ्याबरोबर डॉक्टरांकडे चला.” आणि ते जांबुवंतरावांना घेऊन डॉक्टर हिरानंदानी यांच्याकडे गेले. विरोधकांशी ते अत्यंत दिलदारपणे वागत असत.
जांबुवंतरावांची आई नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सिरीयस होती. यावेळी जांबुवंतराव पुण्याच्या तुरुंगात होते. नाईक साहेबांना हे कळल्यावर त्यांनी जाबुवंतरावांची पुण्याहून नागपूरला जाण्याची सोय केली व ते स्वतःही नागपूरला जांबुवंतरावांच्या आईला भेटून आले. असे हे जगावेगळे वसंतराव नाईक!
विरोधी पक्षाचे लोक विधानसभेत नाईक साहेबांवर टीका करीत, त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत. पण वसंतराव नेहमी शांत सौम्य स्वरात अतिशय समतोलपणाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत. त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही. विरोधकांना त्यांनी कधीही कमी प्रतीचे लेखले नाही. वसंतराव मुख्यमंत्री असताना विरोधी पक्ष नेत्याला मंत्र्याचा दर्जा अधिकृतपणे देण्यात आला नव्हता. पण त्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
आमदार मृणाल गोरे या ‘लाटणे मोर्चा’साठी प्रसिद्ध होत्या. त्या त्यांच्या बोलण्याने मंत्रालय दणाणून सोडत. त्यांच्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण मिळाल्यावर वसंतराव आपल्या पत्नीसह त्या लग्नाला गेले.
पुढे मृणालताई एकदा पुसदला व्याख्यानासाठी गेल्या होत्या. वसंतरावांना हे कळल्यावर ते मृणालताईंना म्हणाले, ”अहो, तुम्ही माझ्या गावाला जाणार आहात, हे मला कळवायचे होते. म्हणजे मी स्वतः तेथे आलो असतो.” नंतर त्यांनी आपल्या भावाला सांगून मृणालताईंची व्यवस्थित सोय केली. या अश्या वागण्यामुळे वसंतरावांचे विरोधकांशीसुद्धा मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध होते.
अशीच एक आठवण बापुसाहेब काळदाते यांची आहे. १९७० सालातील ही गोष्ट. बापुसाहेब विरोधी पक्षाचे आमदार होते. त्यांना क्षय झाला होता. म्हणून डॉक्टरांनी त्यांना ‘विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ नका’ असे सांगितले होते. वसंतरावांना त्यांची विधिमंडळ सभागृहातील अनुपस्थिती जाणवली. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना बापुसाहेब आजारी आहेत असे कळले. त्याच दिवशी वसंतराव त्यांना भेटायला आमदार निवासात केले. बापुसाहेबांची त्यांनी चौकशी केली व मदतीचा हात पुढे केला. उपचार घेण्यासाठी परदेशात जायचे असेल तर सांगा, मी मदत करीन असे आश्वासन दिले.
पुढे १९७२ च्या निवडणुकीत बापुसाहेब हरले. त्यांना परत क्षय झाला. औरंगाबाद येथे गेले असताना वसंतरावांना त्यांची आठवण झाली. ते बापुसाहेबांना भेटायला गेले. खरं तर बापुसाहेब विरोधी पक्षाचे पराभूत झालेले माजी आमदार. पण तरीही वसंतराव त्यांना आवर्जून भेटले.
१९७२ साली जेव्हा महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा पाहणी करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी सोलापूरला आल्या होत्या. शे.का.प.चे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी वसंतरावांना विनंती केली, “माझी आणि इंदिरा गांधींची भेट घडवून द्या.” वसंतरावांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांची व इंदिरा गांधींची भेट घडवली. गणपतराव इंदिरा गांधींना म्हणाले,
“आपल्या येथे जी दुष्काळी कामे चालली आहेत, तेथे स्त्री व पुरुष यांना जी मजुरी दिली जाते, त्यात भेदभाव आहे. असा भेदभाव करणे योग्य नाही.”
इंदिराजींनी वसंतरावांकडे पाहिले. वसंतराव म्हणाले, “ही गोष्ट योग्य नाही”. त्याच दिवसापासून स्त्री व पुरुष दोघांना समान मजुरी द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ मुख्यमंत्री असूनसुद्धा, विरोधी पक्षाच्या आमदाराची मागणी जर योग्य असेल तर ती मान्य करायचा दिलदारपणा वसंतरावांच्या ठिकाणी होता.
१९७२ साली एस. टी. महामंडळाचे संचालक मंडळ नेमण्यात आले. त्या मंडळात वसंतराव नाईक यांनी गणपतराव देशमुख यांना ‘संचालक’ म्हणून नेमले. गणपतरावांना आश्चर्य वाटले. त्यांनी नाईक साहेबांना विचारले,
“तुम्ही मला कसे या मंडळात घेतले ?” वसंतराव म्हणाले,
“तुम्ही कमी बोलता. मुद्दे धरून बोलता. जे लोक कमी बोलतात, तेच विकासाची कामे करून घेतात. यात सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा प्रश्न येतच नाही.”
एकदा सेनापती बापट काही कारणास्तव उपोषणाला बसले होते. विरोधी पक्षातील लोकांनी त्यांना मुद्दामच वसंतरावांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर उपोषणाला बसविले होते. वसंतराव इतके हुशार की त्यांनी अत्यंत नम्रतेने सेनापती बापट यांना सांगितले,
“तुम्ही उपोषण करा, त्याच्या आड मी येणार नाही. पण असे माझ्या बंगल्यासमोर बसण्यापेक्षा बंगल्यात येऊन बसा.”
ते इतके सौजन्यपूर्ण वागले की सेनापती बापटांना त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले. ते वर्षा बंगल्यात उपोषणासाठी गेले. आणि लवकरच हे उपोषण बंद झाले, हे सांगायलाच नको.
वसंतरावांना अनेक लोक भेटायला येत असत. त्यात शेतकरी, आमदार, कार्यकर्ते असे विविध प्रकारचे विविध क्षेत्रातले लोक असत. एके दिवशी भगवी वस्त्रे परिधान केलेला, हातात त्रिशूल घेतलेला, एक साधू वसंतरावांना भेटायला आला. भेटायला आलेल्या लोकांची भली मोठी रांग होती. त्यात तो साधू उभा राहिला. वसंतराव प्रत्येकाला भेटत, आपुलकीने चौकशी करीत, काय काम आहे हे विचारीत. असे करता करता रात्रीचे साडेनऊ वाजले. नाईक साहेबांनी बाहेर रांगेकडे पाहिले. त्यांना तो साधू दिसला. त्यांना जरा आश्चर्य वाटले की या साधूचे माझ्याकडे काय काम असेल? त्यांना साधुसंतांबद्दल आदर होता. म्हणून त्यांनी आपल्या माणसाला त्या साधूकडे पाठवून ‘त्याला आत घेऊन ये’ असे सांगितले. तो माणूस साधूला न्यायला आला, पण साधू महाराज म्हणाले, ‘मी रांग सोडून मध्येच असा भेटायला येणार नाही.’ तो माणूस हात हलवत साधूला न घेता वसंतरावांकडे परत गेला. रात्र वाढत होती. शेवटी रात्रीचे साडेबारा वाजले व त्या साधूचा नंबर लागला. वसंतरावांनी त्या साधूला ‘काय काम आहे’ असे विचारले. साधू म्हणाला, ‘मी काही कविता केल्या आहेत, त्या तुम्ही ऐकाव्यात अशी माझी फार इच्छा आहे.’ वसंतराव म्हणाले,
“मग वेळ कशाला घालवता? म्हणा कविता. मी ऐकतो.”
साधूने चार-पाच कविता ऐकवल्या. तो जायला निघाला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. सर्व नोकरचाकर व घरातले लोक कविता ऐकत ताटकळत उभे होते.
अशी ही वसंतरावांची दिनचर्या. कोणालाही नाराज न करता सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे. मग रात्रीचे कितीही वाजू देत.
अशीच एक आठवण वसंतरावांच्या प्राध्यापकांबद्दलची. मुख्यमंत्री असताना ते एकदा औरंगाबादला गेले होते. त्यावेळी तिथल्या शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मा. गो. देशमुख हे होते. हे मा. गो. देशमुख मूळचे पुसद तालुक्यातील. ते नागपूर मधल्या ‘मॉरिस कॉलेज’मध्ये मराठीचे प्राध्यापक होते. वसंतराव नाईकांनी वकिलीचा अभ्यास करताना एम. ए. करण्यासाठी सुद्धा प्रवेश घेतला होता. तेव्हा मा. गो. देशमुख त्यांना शिकवत. हे लक्षात ठेवून वसंतराव देशमुख सरांना भेटायला गेले व त्यांनी सरांना वाकून नमस्कार केला. शिक्षकाप्रती एवढा आदर असणारा असा मुख्यमंत्री विरळाच!
प्रत्येक व्यक्तीशी वसंतराव इतके प्रेमाने, आस्थेने वागत, याचे अजून एक उदाहरण. एकदा समाजवादी पक्षाचे व लंडन येथे राजदूत म्हणून राहिलेले ज्येष्ठ विचारवंत नानासाहेब गोरे पुसदला व्याख्यानासाठी आले होते. वसंतरावांची व त्यांची भेट औरंगाबाद विमानतळावर झाली. वसंतरावांनी सौजन्याने त्यांना सांगितले, “मी तुमचे भाषण ऐकायला येऊ शकत नाही.” पण नंतर त्यांनी सुधाकर नाईकांना फोन करून नानासाहेबांचे योग्य ते आदरातिथ्य करायला सांगितले. अर्थात याचे नानासाहेबांना खूप आश्चर्य वाटले.
असाच अनुभव शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कृष्णराव धुळप यांनाही आला. कृष्णराव धुळप म्हणत, “वसंतरावांच्या यशस्वी कारकीर्दीचे मर्म त्यांच्या वागणुकीत आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत लोभस आहे. त्यांच्या बोलण्या वागण्यात सुसंस्कृतपणा, खानदानीपणा, प्रेमळपणा आहे. यामुळेच समोरचा माणूस त्यांचा होऊन जातो. समोरची व्यक्ती त्याचा विरोध विसरून कसा व कधी जातो ते त्याचं त्यालाच कळत नाही.”
असे हे ऋजू स्वभावाचे मुख्यमंत्री, की जे विरोधकांनाही आपलेसे करून टाकत, त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत. या त्यांच्या वागणुकीमुळेच त्यांना त्यांच्या कारकिर्दीत विरोधकांचा फारसा त्रास झाला नाही.