दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
वसंतराव जवळपास १७ - १८ वर्षे राजकारणात व्यस्त होते. त्यामुळे थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी काही दिवसांकरिता परदेशयात्रा करण्याचे ठरवले. १९७९ च्या ऑगस्ट महिन्यात ते वत्सलाबाईंना बरोबर घेऊन सिंगापूरला गेले. तेथे ते ओबेराय हॉटेलमध्ये राहिले होते. हा मुक्काम जवळपास दहा-बारा दिवसांचा होता.
वसंतराव व वत्सलाबाई यांनी सिंगापूरला खूप भटकंती केली. वसंतरावांना शेतीची आवड असल्यामुळे त्या दोघांनी सिंगापूरला शेती व फळबागांना भेट दिली. सिंगापूरमध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी, नातेवाईकांसाठी काही भेटवस्तू खरेदी केल्या. एका फळबागेमध्ये वसंतरावांना एक लिंबाचे वेगळ्या प्रकारचे झाड दिसले. असे झाड त्यांनी यापूर्वी पाहिले नव्हते. त्यांना वाटले अश्या लिंबाची पैदास भारतात झाली पाहिजे. या झाडाची लिंबे मोठी व रसदार होती. वसंतरावांनी या लिंबाच्या झाडाची दोन कलमे खरेदी केली. भारतात गेल्यावर पुसदमधल्या आपल्या शेतात ही कलमे लावायची, असे त्यांनी ठरविले होते. हॉटेलमध्येसुद्धा त्यांनी या कलमांची खूप काळजी घेतली. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले.
१८ ऑगस्ट १९७९ रोजी संध्याकाळी ते सिंगापूरहून मुंबईला येणार होते. सर्व तयारी झाली. नोकरांनी सर्व सामान हॉटेलच्या तळमजल्यावर आणले. विमानतळावर जाण्यासाठी गाडी आली होती. शेवटी वसंतराव आणि वत्सलाबाई निघाल्या. वसंतरावांच्या एका हातात एक बॅग व दुसऱ्या हातात लिंबाच्या झाडाचे कलम होते. लिफ्टमध्ये शिरताच वसंतरावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते लिफ्टमध्ये कोसळले. कुठलीही वैद्यकीय मदत मिळायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय मदत दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते शेतीवर प्रेम करीत होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शेती, शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना आखण्यात व्यतीत केले होते. अगदी शेवटीसुद्धा त्यांच्या हातात लिंबाचे कलम होते.
त्यांच्या निधनाची वार्ता काही क्षणातच महाराष्ट्रात येऊन पोहोचली. त्याकाळी दूरदर्शन नव्हते, पण रेडिओवरून ही बातमी दुपारी दोन अडीचला प्रसारित करण्यात आली. वसंतरावांच्या तांड्यातील एकाने आपले बैल चारत असताना ही बातमी ऐकली. तो रडत ओरडत गुरे घेऊन तांड्यात पळत आला. तो ओरडत होता - ‘नाईक साहेब चलेगो.’
हे ऐकून तांड्यात भीषण शांतता पसरली. थोड्याच वेळात सगळे लोक पाराजवळ जमा झाले. त्याकाळी बातम्या ठराविक वेळीच लागत असत. बातम्यांची वेळ होती संध्याकाळी साडेसात वाजताची. सर्वजण दुःखी अंतःकरणाने रेडिओसमोर गोळा झाले होते. ‘ही बातमी खोटी असू देत’ असे जो तो म्हणत होता. पण शेवटी साडेसातच्या बातम्यात ही नकोशी वाटणारी बातमी सर्वप्रथम सांगितली गेली. लोक धाय मोकलून रडायला लागले. त्यांचा लाडका नेता त्यांना कायमचे सोडून गेला होता. बंजारा जमातीसाठी, स्वतःच्या तांड्यासाठी वसंतरावांनी खूप काम केले होते. बायका डोळ्याला पदर लावून रडत होत्या. गोरमाटी जनतेवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. कोण कोणाला समजवणार? कोण कोणाला आधार देणार? त्यांचा मोठा आधारच निखळून पडला होता. त्या दिवशी कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. गाई गुरांना खुंट्याला बांधायलासुद्धा लोक विसरून गेले. लहान मुले भुकेने रडत होती. त्यांच्याकडेही कोणाचे लक्ष नव्हते. प्रत्येकाला आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख होते.
सकाळी सर्वांनी पुसदचा बंगला गाठला. तेथे प्रचंड गर्दी जमली होती. रात्रीपासूनच पुसदला लोक जमायला सुरुवात झाली होती. जवळपास ७०-८० हजार लोक जमले होते. वसंतरावांच्या पार्थिवाबरोबर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व इतर मान्यवर मंडळी आली होती. दुपारी चार वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले व मग पार्थिव गहुली येथे नेण्यात आले. पुसद ते गहुली रस्त्यात अनेक गाड्या उभ्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा लोक अंतिम दर्शन घेण्यासाठी उभे होते. हरितक्रांतीचा प्रणेता, शेतकऱ्यांचा सच्चा मित्र त्यांना सोडून गेला होता.
नाईक साहेब ज्या शेतात खेळले तेथे च त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. एक अंक संपला होता. बंजारा समाज दुःखात बुडाला होता. महाराष्ट्राला सर्वार्थाने प्रगतीपथावर नेणारा नेता हरपला होता. असा मुख्यमंत्री परत होणे नाही एवढेच खरे.