दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
वसंतराव नाईक यांचे कौटुंबिक सहजीवन खूप आनंदाचे, सुखासमाधानाने ओतप्रोत भरलेले होते. त्यांचे वडील फुलसिंग बापूजी एक सधन शेतकरी होते. ते समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या बंजारा तांड्याचे नेतृत्व केले. बंजारा समाजातील अंधश्रद्धा, वाईट रूढी, परंपरा कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे’ याची जाणीव त्यांना होती, म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना हाजू सिंग (वसंतराव) व राजू सिंग (बाबासाहेब) यांना शिक्षण दिले. वसंतराव व बाबासाहेब हे दोघे भाऊ म्हणजे आदर्श भाऊ. दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते. वसंतरावांनी कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतले. ते वकील झाले. तेव्हा बाबासाहेबांनी आपले शिक्षण सोडून देऊन घरचा व्यवसाय सांभाळला. पुढे वसंतरावांनी मुख्यमंत्री होऊन त्यांनी राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळला, तेव्हा बाबासाहेबांनी पुसद व यवतमाळ इथले राजकारण व्यवस्थितपणे सांभाळले. वसंतरावांकडून काही काम करून घ्यायचे असेल तर लोक बाबासाहेबांकडे येऊन तगादा लावत. वसंतराव बाबासाहेबांचा खूप आदर करीत.
वसंतरावांच्या वडिलांनी आपल्या शेवटच्या क्षणी ‘पुसदला कॉलेज सुरू करावे’ अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा वसंतराव व बाबासाहेबानी त्यांना ‘तुमची इच्छा पूर्ण होईल’ असे सांगितले.
१९७९ मध्ये बाबासाहेब नाईकांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा वसंतरावांनी प्रख्यात डॉक्टरांना मुंबईहून आणले. डॉक्टरांनी जेव्हा वसंतरावांना सांगितले की बाबासाहेबांची प्रकृती गंभीर आहे, तेव्हा कणखर व्यक्तिमत्त्वाचे वसंतराव ओक्साबोक्शी रडले, असे डॉ. एन पी हिराणी सांगतात. बाबासाहेब गोरगरिबांचे कैवारी होते. प्रत्येक सणाला ते तांड्यात जात व लोकांबरोबर तो सण साजरा करीत. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते त्यांना मदत करीत.
वसंतरावांचे लग्न वत्सलाबाईंशी झाले. वत्सलाताईंनी वसंतरावांना आयुष्यभर मोलाची साथ दिली. त्यांना एकूण तीन मुले झाली. मोठी अरुंधती. तिचे अपघाती निधन झाले. दोन मुले अविनाश व निरंजन. अरुंधती कवयित्री होती. तिला नाटक, वक्तृत्व अश्या गोष्टींमध्ये रस होता. वसंतरावांचे आपल्या लेकीवर खूप प्रेम होते. ती गेल्यावर वसंतराव खचले, पण त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून मुख्यमंत्री म्हणून आपली सर्व कर्तव्ये पार पाडली.
निरंजन लहान असताना एक मजेशीर घटना घडली. वसंतरावांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. ते वर्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या बंगल्यात राहत होते. सचिवालयात जाताना आपल्या गाडीचा सायरन वाजवत, मागे पुढे पोलिसांची गाडी घेऊन, ते जात असत. निरंजन हे रोज पाहत असे. एक दिवस तो वसंतरावांना म्हणाला,
“देसाई काका सायरन वाजवीत ऑफिसात जातात. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा मोठे आहात. मग तुम्ही का सायरन वाजवीत जात नाही ?”
वसंतरावांनी त्याला समजावले व सांगितले, “काकांना सायरन वाजवत जायचे तर जाऊ देत. पण आपण तसे करायचे नाही.”
पण छोट्या निरंजनचे समाधान झाले नाही. तो म्हणाला, ”आपण एक दिवस तरी तसे सायरन वाजवत जाऊ या.”
शेवटी निरंजनच्या बालहट्टापुढे वसंतरावांनी हार मानली. एक दिवस ते आपल्या दोघा मुलांना गाडीत घेऊन सायरन वाजवत मंत्रालयात गेले.
निरंजनची अजून एक आठवण सांगण्यासारखी आहे. एकदा वसंतराव व वत्सलाताई युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. प्रकृती दाखविण्यासाठी म्हणून त्यांनी अविनाशला पण बरोबर नेले होते. युरोपहून परत आल्यावर निरंजनने विचारले,
“काका, तुम्ही मला का युरोपला नेले नाही?”
निरंजन व अविनाश दोघे वसंतरावांना ‘काका’ म्हणत, कारण वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव, मधुकरराव व मनोहरराव त्यांना ‘काका’ म्हणत असत. हे बघून ही दोन्ही मुले पण वसंतरावांना ‘काका’ म्हणून हाक मारू लागली. वसंतरावांनी निरंजनला सांगितले,
“अरे मी आणि आई लालबहादूर शास्त्रींची परवानगी घेऊन युरोपला गेलो होतो. अविनाशला बरे नव्हते म्हणून लंडनच्या डॉक्टरांकडे त्याला नेले होते.”
या उत्तराने निरंजनचे समाधान झाले नाही. पुढे एकदा लालबहादूर शास्त्री मुंबईला आले होते, तेव्हा निरंजनने निरागसपणे शास्त्रीजींच्या जवळ जाऊन विचारले,
“तुम्ही मला युरोपला जायची परवानगी का दिली नाही?”
शास्त्रीजींना काही कळले नाही. इतक्यात वसंतरावांनी शास्त्रीजींना सगळी हकीकत सांगितली. तेव्हा शास्त्रीजी निरंजनला म्हणाले,
“तू मला पत्र पाठव आणि परवानगी घे.”
नंतर निरंजनने शास्त्रीजींना पत्र पाठवले. शास्त्रीजींनी त्याला उत्तरही दिले. हे पत्र निरंजनने अजूनही जपून ठेवले आहे.
वसंतरावांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते घरी कितीही उशिरा आले तरी प्रथम नोकरांच्या खोलीत जात. त्यांची विचारपूस करीत, ते जेवले का नाही याची प्रेमाने चौकशी करीत. आणि म्हणूनच नोकर पण त्यांची प्रेमाने काळजी घेत.
एकदा बाबासाहेब आजारी होते. त्यांना भेटायला वसंतराव पुसदला आले. बाबासाहेबांना चिंता वाटत होती की आता पेरणी कशी होईल? मी तर आजारी आहे. वसंतराव दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर गेले. चार दिवसात त्यांनी पेरणी पूर्ण केली आणि मग घरी आले. मुख्यमंत्री आहे म्हणून मी हे काम कसे करू, असे त्यांना अजिबात वाटले नाही. यावरून ‘काळी आई’ व मोठा भाऊ यांच्यावर ते जीवापाड प्रेम करत हे दिसून येते.