दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
वसंतरावांना शिकार करण्याचा छंद होता. हा छंद त्यांना कसा लागला, हे शोधण्याचा प्रयत्न केला तर असे समजते की ते ज्या गावात राहत होते ते गाव गहूली. ते घनदाट जंगलांनी वेढलेले होते. या जंगलात अनेक हिंस्त्र श्वापदे होती. भोवतालच्या परिसरातील लोकांना या जंगली हिंस्त्र श्वापदांमुळे त्रास व्हायचा. यासाठी त्यावेळच्या सधन शेतकऱ्यांकडे बंदुकी होत्या. वसंतरावांचे वडील सधन शेतकरी होते. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. त्यावेळी वसंतराव व राजकारणातील सहकारी बाबासाहेब मुखरे यांची शिकारीच्या समान छंदामुळे मैत्री झाली. शिकार करताना वसंतराव ससे, हरिण अश्या निरूपद्रवी प्राण्यांची शिकार करीत नसत. वाघ, बिबट्या, चित्ता, पट्टीदार वाघ अश्या क्रूर प्राण्यांची शिकार ते करीत. पुसद मधल्या त्यांच्या बंगल्यामध्ये प्रशस्त दिवाणखान्यात त्यांनी शिकार केलेल्या दोन वाघांची व्याघ्रचर्मे भिंतीवर त्यांच्या मुंडक्यांसह लावले होते आणि या दोन व्याघ्रचर्मांच्या मध्ये त्यांनी शिकार केलेल्या रान-रेड्याचे मुंडके लटकावले होते.
एकदा नेपाळचे राजे वीरेंद्र भारतात आले होते. तेव्हा वसंतराव नाईकानी त्यांना ताडोबाच्या जंगलात नेले. या शिकारीच्या छंदामुळे अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी निर्माण झाली. या क्षमतेचा उपयोग त्यांना मुख्यमंत्री असताना झाला.
कधीकधी त्यांच्यासमोर एखादी अवघड समस्या यायची. पण ते अत्यंत शांतपणाने अचूक निर्णय घेऊन ती समस्या सोडवत असत. पुसदचे व यवतमाळचे लोक नेहमी वसंतरावांच्या शिकारीच्या कथा सांगत असतात.