दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
भारत-चीन युद्ध सुरू झाल्यावर पंडित नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावून घेतले व त्यांच्या समर्थ खांद्यावर ‘संरक्षणमंत्री’ पदाची धुरा दिली. वर्तमानपत्रातून पहिल्या पानावर बातमी आली, ‘हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावून गेला’. यानंतर श्री. मारोतराव कन्नमवार दुसरे मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या आकस्मित निधनानंतर ‘हंगामी’ मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब सावंत यांची नियुक्ती झाली. यानंतर सर्वानुमते मंत्रिमंडळात असलेले अजातशत्रू वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. वसंतराव जवळजवळ अकरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. याचा अर्थ महाराष्ट्रातले हे एकच मुख्यमंत्री, जे दीर्घकाळ त्या पदावर होते. वसंतरावांचा मुख्यमंत्री असतानाचा काळ हा महाराष्ट्राचा ‘सुवर्णयुग काळ’ असे म्हणता येईल. सुवर्णकाळ असे म्हटले तरी वसंतरावांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. ५ डिसेंबर १९६३ हा दिवस भटक्या विमुक्त जमाती मधील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यांच्यातला एक जण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला होता. त्यांच्यासाठी हा दिवस सोनेरी पहाट घेऊनच उगवला.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत वसंतरावांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले.
१) मिसा कायद्याखाली अटकेत असलेले आचार्य अत्रे यांची विनाअट सुटका करण्यात यावी.
२) ज्वारी महाग झाली होती त्यामुळे सरकारने ज्वारी खरेदी करून रेशन दुकानात स्वस्त दरात ज्वारी विकणे.
३) हातभट्टीची विषारी दारू पिऊन लोक मृत्यू पावले होते म्हणून दारूबंदीच्या कठोर धोरणात शिथिलता आणणे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ दीड महिन्यांनी ते त्यांच्या गावी गहुली येथे गेले. त्यांनी त्यांचा प्रवास अगदी साधेपणाने सामान्य माणसाप्रमाणे केला. मुंबई ते अकोला रेल्वे व नंतर अकोला ते पुसद मोटारीने. रस्त्यात प्रत्येक गावात त्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत झाले. जागोजागी महिला त्यांचे ओवाळून स्वागत करीत होत्या. असे लोकांचे प्रेमभरले स्वागत, हार तुरे स्वीकारत ते आपल्या जन्मग्रामी गहुली येथे पोहोचले. गहुली गाव तर उत्साहात न्हाऊन निघाले होते. त्यांचे घर तर आतुरतेने आपल्या छोट्या बाबाची (हाजुसिंगची) वाट पाहत होते. असे सर्व स्वागत घेत घेत घरी पोहोचायला उशीर झाला म्हणून वसंतरावांचे वडील फुलसिंग त्यांना रागावून म्हणाले, “मन फसायो जकोण फसायो, लोकुन तरी मत फसायेस?” म्हणजे “मला फसवले ते फसवले, पण लोकांना तरी फसवू नकोस. वेळेवर येत जा.”
त्या काळी मुख्यमंत्र्यांसाठी ‘सह्याद्री’ बंगला आरक्षित ठेवला जात होता. पण वसंतराव तेथे राहायला न जाता त्यांच्या आधीच्याच ‘वर्षा’ बंगल्यावर राहिले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांसाठी ‘वर्षा’ हा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बनले.
वसंतराव मुख्यमंत्री झाल्यावर चारही बाजूने संकटेच संकटे उभी राहिली. अन्नधान्याचा तुटवडा, दुष्काळी परिस्थिती, महागाई, राज्य कर्मचाऱ्यांचा संप, मोर्चे, एक ना दोन - अनेक समस्या. या सर्व समस्यांशी मनाचे संतुलन राखत वसंतरावांनी तोंड दिले व ते यशस्वी ठरले. या सगळ्या अडचणींशी दोन हात करत त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेले. यशवंतरावांनी जो वारसा त्यांना दिला होता तो त्यांनी खंबीरपणे सांभाळला.
बेळगाव कारवार हा सीमावर्ती मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात विलीन करून घेण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. एकाधिकार कापूस खरेदी, महाराष्ट्र राज्य लॉटरी, बॅकबे रेक्लमेशन योजना, शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची योजना इत्यादी अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केल्या.
वसंतरावांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला होता. शिवसेनेचा उदय झाला होता. परंतु एवढे असूनही १९६७ च्या निवडणुकीत परत काँग्रेस पक्ष विजयी झाला. वसंतराव नाईक दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दुसऱ्या मुख्यमंत्री पदाचा काळ १९६७ ते १९७२ इतका होता. या कालावधीत ‘मटका किंग’ रतन खत्री यांच्या मटक्यामुळे, मध्यमवर्ग व कामगार वर्ग यांच्या आयुष्याची धूळधाण झाली होती. रतन खत्रीच्या मटक्याला चाप बसावा म्हणून वसंतरावांनी ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ सुरू केली.
वसंतरावांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याने १७ मार्च १९७० रोजी सिडकोची (सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची) स्थापना केली. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचा भार कमी करण्यासाठी, तसेच मुंबईला पर्याय म्हणून एक नवीन शहर वसवण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली.
सिडकोची स्थापना झाल्यानंतर लगेचच, १९७१ मध्ये 'न्यू बॉम्बे' (आताचे नवी मुंबई) हे शहर विकसित करण्याचे काम सुरु केले गेले. वसंतरावांच्या दूरदृष्टीमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. नवी मुंबई हे आज देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते.
सिडकोने केवळ नवी मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर शहरांच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९७२ मध्ये सिडकोने औरंगाबाद शहरात टाउनशिप विकसित करण्याचे काम हाती घेतले. या टाउनशिपमध्ये निवासी वसाहती, व्यावसायिक केंद्रे, उद्याने आणि इतर आधुनिक सुविधांचा समावेश होता. सिडकोच्या या कामामुळे औरंगाबादचा नियोजनबद्ध विकास झाला, ज्यामुळे शहराला एक आधुनिक आणि सुनियोजित रूप मिळाले आणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली.
१९६७ व १९७२ या दोन निवडणुका वसंतराव नाईक यांच्या कर्तृत्वाखाली लढविल्या गेल्या व काँग्रेसला प्रचंड यश मिळाले. यावेळी वसंतदादा पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. १९७१ मध्ये बांगलादेशचे युद्ध झाले व ‘बांगलादेशा’ची निर्मिती झाली. यामुळे देशभर काँग्रेसची हवा होती. या सुमारास १९७२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या व काँग्रेस पक्षाला विजय मिळाला. १६ मार्च १९७२ रोजी वसंतराव तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
अश्याप्रकारे तब्बल साडेअकरा वर्षे वसंतराव मुख्यमंत्री पदावर होते. त्यांनी मातब्बर अश्या तीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा कारभार यशस्वीपणे सांभाळला.
१९७२ नंतर ‘मराठवाड्याचा मुख्यमंत्री हवा’ ही मागणी जोर धरू लागली. वसंतराव विदर्भाचे होते व ते दीर्घकाळ मुख्यमंत्री होते, हे काही लोकांना सलत होते. वसंतराव त्यांच्या कल्पक योजनांमुळे देशभर प्रसिद्ध झाले होते. विरोधकांना हे सहन होत नव्हते. विरोधकांनी एकत्र येऊन शेवटी वसंतरावांना राजीनामा द्यायला भाग पाडले.
हे साल होते १९७५. अर्थात वसंतरावांनी अत्यंत शांत चित्ताने हे ही स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना ते म्हणाले,“माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी पदावर नसलो तरी महाराष्ट्राची सेवा करण्यातच मी माझी शक्ती खर्च करीन. महाराष्ट्र विकसित व्हावा, शेतकरी सुखी व्हावा हीच माझी इच्छा आहे.” त्यांनी अत्यंत खुल्या मनाने नवीन मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांचे स्वागत केले. हीच ती भगवद्गीतेत सांगितलेली ‘स्थितप्रज्ञाची मूर्ती’. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांकडे कुठल्याही प्रकारे विचारणा केली नाही.
पुढे १९७५ ते १९७७ या कालावधीत भारतात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधींनी स्वतःचे नाव जगात चांगले रहावे म्हणून १९७७ मध्ये लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. आणीबाणी व इतर काही कारणांमुळे लोक काँग्रेसच्या विरोधात होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे भुईसपाट झाला व केंद्रात प्रथमच गैर काँग्रेस म्हणजे ‘जनता पार्टी’ची सत्ता आली. काँग्रेसच्या विरोधात हवा असूनसुद्धा वाशिम लोकसभा मतदारसंघातील जनतेने वसंतरावांना भरघोस मतांनी निवडून दिले. यावरून त्यांचे लोकांच्या मनात असलेले स्थान दिसून आले. त्यांची लोकप्रियता दिसून आली. ते आता खासदार झाले.
पण हा काळ फक्त अडीच वर्षाचाच राहिला. ( मार्च ७७ ते ऑगस्ट ७९) .