दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
२०१२ च्या ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक विशेषांक काढला. या अंकाचे संपादक श्री. प्रमोद नलावडे हे होते. या अंकात काही मान्यवर व्यक्तींचे वसंतरावांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातील काही जणांच्या लेखांचा सारांश खालील प्रमाणे :
त्या वेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात,
“वसंतराव एक क्रांतिकारी होते. त्यांनी जी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली, त्याची फळे आज आपण चाखत आहोत. वसंतराव त्यांच्या अत्यंत आधुनिक पोशाखाबद्दल प्रसिद्ध होते. ते कायम बंद गळ्याचा जोधपुरी कोट घालत. तोंडात पाईप, सोनेरी काड्यांचा चष्मा. पण एवढं असूनही ते मनाने पक्के मराठी व शेतकरी होते. ते त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व त्यांची कामाबद्दलची जी निष्ठा होती, त्यामुळे प्रसिद्ध झाले. म्हणूनच ते एवढा दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले.”
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात,
“वसंतरावांच्यावर हरिभाऊ आपटे, नाथमाधव, महात्मा फुले व साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा होता. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण व त्यांच्या सामाजिक जाणीवा हे त्याचे फलित होते. शेती हा त्यांचा बहिश्चर प्राण होता. वसंतरावांनी महाराष्ट्राचे उद्योग-व्यवसाय, अर्थकारण, समाजकारण, राजकारण व कृषी क्षेत्र यावर आपल्या कामाने एक ठसा उमटविला आहे. त्यांनी त्यांच्या काळात अशी काही ठोस पावले उचलली, असे काही निर्णय घेतले, की त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर गेले. १४ फेब्रुवारी १९६४ रोजी त्यांनी ‘मराठी ही सरकारी आस्थापनांमध्ये कामकाजाची भाषा असावी’ असा निर्णय घेतला. त्यांनी पैठण येथे ‘खुला तुरुंग’ सुरू केला. यातच त्यांचे आधुनिक विचार दिसून येतात. खुला तुरुंग म्हणजे ज्या कैद्यांची वागणूक चांगली आहे, त्यांना बंद तुरुंगात न ठेवता शेतावर किंवा धरणाच्या कामावर पाठवणे.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या कार्याने, वेगवेगळ्या योजना आखून वसंतरावांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आज महाराष्ट्र प्रगती करीत आहे.
त्या वेळचे केंद्रातले कृषीमंत्री शरद पवार वसंतरावांबद्दल लिहितात, ”माझ्यासारख्या तरुण मंत्र्यामध्ये वसंतरावांनी आत्मविश्वास निर्माण केला. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक प्रगत महाराष्ट्राचा पाया घातला, तर वसंतरावांनी त्यावर कळस चढविला व महाराष्ट्र राज्य सर्वदृष्टीने विकसित झाले. वसंतरावांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राला ‘सहाय्यक’ अशी कारखानदारी उदयास आली. शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायाला पूरक असे व्यवसाय त्यांच्या काळात सुरू केले. शेती व कारखाने, दोन्हीसाठी वीज व पाणी यांची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून ‘कोराडीचा वीज प्रकल्प’ व ‘जायकवाडी धरण’ याच काळात कार्यान्वित झाले. कोयनेचा भूकंप व १९७२ चा दुष्काळ या कालावधीत वसंतरावांनी अत्यंत धीरोदात्तपणे काम केले. त्यांच्या बोलण्याने, वागण्याने सर्वसामान्य लोकांच्यातही आत्मविश्वास निर्माण झाला.”
शरद पवार पुढे म्हणतात, ”मी कृषीमंत्री असल्यामुळे वसंतरावांनी दुसऱ्या राज्यातून धान्याची मदत मागण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. मी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे अन्नधान्याची मदत मागत होतो. पण ही गोष्ट वसंतरावांना डाचत होती. महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यावर ही पाळी यावी हे त्यांना रुचत नव्हते. म्हणून त्यांनी पुण्यातल्या एका सभेत शनिवारवाड्यावर अशी प्रतिज्ञा केली की ‘मी पुढच्या दोन वर्षात अन्नधान्याचे उत्पादन वाढवून दाखवीन, आणि तसे झाले नाही तर मला सर्वांसमक्ष फाशी द्या’. ”
वसंतरावांच्या काळात अनेक बांध बांधले गेले. शेतात विहिरी खोदल्या गेल्या, हजारो एकर जमीन ओलिताखाली आणली गेली.
‘दैनिक लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार हे एक ख्यातनाम मराठी लेखक व विचारवंत आहेत. ते वसंतरावांबद्दल लिहितात - ‘वसंतरावांना समाजातल्या सर्व स्तरातून, म्हणजे शेतकरी, मध्यमवर्ग व अतिश्रीमंत वर्ग यांच्याकडून मान मिळत असे’.
यशवंतराव चव्हाण ‘संरक्षणमंत्री’ झाल्यावर सहाजिकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मारोतराव कन्नमवार (जे त्यावेळचे ‘डेप्युटी मुख्यमंत्री’ होते ) यांच्याकडे गेले.
थोड्याच महिन्यात कन्नमवार निधन पावले. यावेळी मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हा प्रश्न पुढे उभा राहिला. बाळासाहेब देसाई साताऱ्याचे होते. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठी होता. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता, म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असे सर्वांना वाटत होते. पण तसे झाले नाही. वसंतराव नाईक यांच्यापाठी फक्त बंजारा समाज होता, जो अतिशय लहान होता. ते लोक सुशिक्षित नव्हते. महत्त्वाचे म्हणजे ते विमुक्त भटक्या जमातीचे होते. शिवाय वसंतरावांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नव्हता. त्यांच्या पाठी कुठलेही वलय नव्हते, तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. याचा अर्थच वसंतरावांना राजकारणातील, तसेच प्रांतिक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते हे निश्चित. वसंतरावांचे पहिले काम होते मराठा समाजाकडून सहानुभूती मिळवणे.
असे म्हणतात की यशवंतराव चव्हाण यांना मराठा मुख्यमंत्री नको होता, म्हणून त्यांनी वसंतरावांसारख्या विमुक्त जमातीतल्या एका रत्नाला पुढे आणले. यशवंतराव चव्हाण त्यांच्या पाठी भक्कमपणे उभे होते म्हणून वसंतरावांनी सर्व आव्हाने स्वीकारली. शिवाय वसंतरावांचा मृदू स्वभाव, मनाचा मोकळेपणा, मृदूभाषा, दुसऱ्यांना आपले म्हणणे पटवून देण्याची पद्धत, त्यांचा हसरा चेहरा - या सर्वांमुळे ते थोड्याच दिवसात सर्व लोकांना आवडू लागले. त्यांनी विरोधकांनाही आपलेसे करून घेतले होते. म्हणून विरोधी पक्षाचे अत्रे, व मृणाल गोरे पण त्यांची प्रशंसा करीत.
वसंतरावांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यामागे अजून एक कारण होते. त्यावेळी ‘स्वतंत्र विदर्भा’ची मागणी लोकनायक बापूजी अणे, टी. जी. देशमुख व जांबुवंतराव धोटे करीत होते. वसंतराव विदर्भाचे असल्यामुळे ही मागणी आपोआपच मागे पडली.
द्वादशीवार एक मजेदार प्रसंग सांगतात.
१९७३ मध्ये यवतमाळला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ भरले होते. त्यावेळी त्या संमेलनास वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, यशवंतराव चव्हाण, ग. दि. माडगूळकर इत्यादी लोक आले होते. उद्घाटन समारंभ पार पडला व ते सर्वजण जवळच पटांगणावर गप्पा मारीत उभे होते. वसंतरावांनी त्यांचा लाडका पाईप पेटविण्यासाठी खिशातून काड्यापेटी काढली. इतक्यात एक मुंडासे बांधलेला खेडूत वसंतरावांजवळ आला व म्हणाला, ”माझी विडी विझली आहे. ती पेटवायला मला काड्यापेटी देता का?” वसंतरावांनी त्याच्याकडे पाहिले व कोणालाही काही समजायच्या आत त्याची विडी पेटवून दिली. हे सर्व एक बातमीदार पहात होता. त्याने त्या खेडूताला विचारले, “तुला माहित आहे का तुझी विडी कोणी पेटवून दिली?” तो खेडूत निरागसपणे म्हणाला, ”मला माहित नाही.” त्यावर तो बातमीदार म्हणाला, “अरे ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आहेत.”
त्यावर तो खेडूत सहजपणे म्हणाला, “अरे बापरे! फुलसिंग नाईक साहेबांचा मुलगा!” आणि तो निघून गेला. यावरून कळून येते की त्याकाळी मोठे नेते, मंत्री व सामान्य माणूस हे सहजपणे एकमेकांजवळ जाऊ शकत होते. त्या काळी पोलिसांकडून सुरक्षा इत्यादी गोष्टी फार काटेकोरपणे पाळल्या जात नव्हत्या.
वसंतराव मुख्यमंत्री होते, पण ते ‘राजकारणी’ नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलत नसे. त्यांचा सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक होता. त्यांनी त्यांच्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कोणी कधीही आरोप करू शकले नाहीत. अकरा वर्षे मुख्यमंत्री राहूनही त्यांची कारकीर्द अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ होती. याचमुळे समाजातील सर्व स्तरात, सर्व पक्षात अगदी विरोधी पक्षातसुद्धा त्यांना मान होता. ते सर्वांच्या बरोबर असूनही त्यांचे व्यक्तिमत्व निराळे होते.
त्यावेळचे ‘केंद्रीय गृहमंत्री’ सुशीलकुमार शिंदे लिहितात, “वसंतराव नाईक यांनी माझी राजकारणातील कारकीर्द घडवली आहे. त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांनी मला जी विचारधारा दिली त्याप्रमाणे मी पुढे जात आहे.”
ते एक आठवण सांगतात, “वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते व मी एक पोलीस ऑफिसर होतो. मी योगायोगाने राजकारणात आलो. १९७४ सालची गोष्ट आहे. मी राज्य विधिमंडळाच्या ‘पोटनिवडणुकी’ला उभा होतो. निवडणुकीसाठी तिकीट मिळाल्यावर मी वसंतरावांना भेटायला त्यांच्या वर्षा बंगल्यावर गेलो. तेथे मला त्यांचे सचिव नाशिककर भेटले. मी त्यांना सांगितले की मी वसंतरावांना भेटायला आलो आहे. नाशिककरांनी मला दिवाणखानात बसायला सांगितले. दीड तास झाला तरी काही हालचाल नाही. शेवटी मी नाशिककरांना विचारले, “तुम्ही माझा निरोप वसंतरावांना सांगितलात का?” ते म्हणाले, “माफ करा. मी तुमचा निरोप सांगायला कामाच्या गडबडीत विसरून गेलो.” आणि मग त्यांनी माझ्यासमोरच वसंतरावांना फोन केला. पाच मिनिटात वसंतराव मला भेटायला दिवाणखान्यात आले. त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली व ‘आत्मविश्वासाने निवडणूक लढ’ असे सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी मला एका पाकिटात निवडणूक लढविण्यासाठी काही पैसे पण दिले. ते म्हणाले, “तुझ्या प्रचारसभांना मी स्वतः येईन.” दिलेल्या शब्दाप्रमाणे वसंतराव प्रचार सभेत आले. त्यांनी लोकांना सांगितले, “तुम्ही सुशीलकुमार शिंदे यांना निवडून द्या. त्याचे भविष्य अत्यंत उज्वल आहे. तो जर निवडून आला तर मी त्याला मंत्रिमंडळात घेईन.” मला तर हे अशक्यच वाटत होते. एक तर मी पहिल्यांदाच निवडणूक लढत होतो व माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते होते. पण वसंतरावांनी लोकांना दिलेला शब्द पाळला. मला विजय मिळाल्यावर मंत्रिमंडळात सामील करून घेतले. पुढे मी ‘मुख्यमंत्री’ झालो. मग ‘गव्हर्नर’ झालो. आज मी केंद्रात ‘गृहमंत्री’ आहे. पण माझ्या उमेदवारीच्या काळात मी वसंतरावांकडून खूप काही शिकलो. वसंतराव तळागाळातल्या सामान्य लोकांच्या, शेतकरी व वंचित समाजातल्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे, त्या सोडविण्याचे प्रयत्न करायचे. मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले, त्यांच्या सहवासात रहायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. ते नेहमी म्हणायचे, “समाजातला दुर्लक्षित, उपेक्षित माणूस जोपर्यंत विकास पावत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर आहे, असे आपण म्हणू शकत नाही.”
‘डेली लोकमत’चे दिनकर रायकर म्हणतात - वसंतराव नाईक यांच्यामुळे एमआयडीसी (M.I.D.C.) संपूर्ण राज्यभर निर्माण झाली. ते एक द्रष्टे पुढारी होते, म्हणून त्यांनी कारखान्यांवर भर दिला. हे कारखाने शहरापासून थोडे दूर सुरू केले तर खेडेगावातल्या लोकांना रोजगार मिळेल व शहरावरील ताण पण वाढणार नाही - असा विचार त्यांनी केला होता. वसंतराव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रात वीज व पाणी याचा तुटवडा नव्हता. महाराष्ट्र राज्य कर्नाटक व गुजरातला वीज पुरवत होते. कारखानदारांना जमीन व वीज याची समस्या नव्हती. राज्यभर शांतता, सुव्यवस्था व स्थैर्य होते, म्हणून बाहेरच्या राज्यातून कामगारांचा लोंढा महाराष्ट्रात येत होता. अन्नधान्य विपुल प्रमाणात पिकत होते. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध होत्या. नाईक साहेबांच्या हातात सुकाणू होते, म्हणून महाराष्ट्राची बोट योग्य दिशेने प्रवास करीत होती. त्यांना मदत करायला केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण होते, तर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष वसंतदादा पाटील महाराष्ट्रात होते.
या तिघांच्यामुळे महाराष्ट्राने भरपूर प्रगती केली.
वसंतरावांचे पुतणे मनोहरराव नाईक त्यावेळी ‘अन्न व औषध प्रशासना’चे मंत्री होते. ते यवतमाळच्या एका पत्रकाराला मुलाखत देताना म्हणतात -
“वसंतराव हरितक्रांतीचे प्रणेते, सर्वसामान्यांचे लाडके नेते, चार कृषी विद्यापीठाचे संस्थापक होते. अशी काहीही बिरूदे त्यांच्यापाठी असली, तरी ते हाडाचे शेतकरी होते. ते पुसदला आल्यावर गहूलीला जाऊन स्वतःच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत. संकरित ज्वारी, कापूस, टोमॅटो यांचे प्रयोग त्यांनी प्रथम गहूलीला केले. ते यशस्वी झाल्यावर मगच इतर शेतकऱ्यांना सांगितले. कधी कधी प्रयोग फसत. पैसा फुकट गेला म्हणून बाबासाहेब त्यांना रागवत. तेव्हा वसंतराव म्हणत, “आपल्याकडचा पैसा फुकट गेला तरी चालेल. आपल्याला पैशाची तितकीशी चणचण नाही, पण माझ्या गरीब शेतकऱ्यांचा पैसा मी फुकट जाऊ देणार नाही.”
मुलाखत घेणाऱ्या वार्ताहराने सुधाकररावांना विचारले, “वसंतराव कधी संभ्रमात पडले आहेत का?” सुधाकरराव नाईक म्हणाले, “हो. जेव्हा काँग्रेस पक्षात फूट पडली, इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण वेगळे झाले, तेव्हा वसंतरावांना कळेना, कोणाला पाठिंबा द्यायचा? कोणाच्या पक्षात जायचे?” यावर चर्चा करण्यासाठी वसंतराव ताबडतोब पुसदला आले. त्यांनी बाबासाहेबांना विचारले “या परिस्थितीत मी काय करू?” बाबासाहेबांनी ताबडतोब उत्तर दिले, “तू आज जो कोणी आहेस, तो केवळ यशवंतरावांच्या मुळे. शिवाय यशवंतरावांकडे नीतिमत्ता व बुद्धिमत्ता दोन्ही आहे. त्यांच्याइतका श्रेष्ठ नेता कोणीही नाही. त्यामुळे तू यशवंतरावांच्या पक्षात जा.” वसंतरावांनी पण बाबासाहेबांचे म्हणणे मान्य केले व यशवंतराव चव्हाण यांना पाठिंबा दिला.
सुधाकरराव आपल्या काकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना म्हणतात, “माझे काका वसंतराव नाईक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे, दिलदार, मोकळ्या मनाचे होते. ते खुर्चीचा आब राखून संयमाने बोलत. राजकारणात त्यांना नेहमीच मान दिला जाई, कारण ते नेहमी नि:पक्षपातीपणाने वागत. मुख्यमंत्री हे पद लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या पदाचा आदर कसा राखला जाईल, हे ते नेहमी पाहत असत. घरातल्या लोकांची व त्यांची नात्याची वीण अत्यंत घट्ट होती. त्यांना कोणाचा राग आला की ते हात वर करून एवढेच म्हणत, “मी तुला काय सांगू?”
वसंतराव क्रिकेटचे अत्यंत शौकीन होते. मुंबईत झालेली प्रत्येक टेस्ट मॅच ते पाहायला जात असत. त्यांना मांसाहार करायला फार आवडे.
नारायण हरलीकर लिहितात-
आज आपण दक्षिण मुंबईतील कफ परेड व नरिमन पॉईंट पाहतो. तिथल्या आलिशान उंच इमारती आपल्याला भुरळ घालतात. ही दोन्ही ठिकाणे वसंतरावांनी मुंबईला दिलेली ‘भेट’ आहे. मुंबई वाढत होती. जागा अपुरी पडत होती, म्हणून वसंतरावांनी समुद्रात भर टाकून हा भाग बनविला.
प्रख्यात उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर म्हणतात -
वसंतरावांची ध्येये ठळक व स्पष्ट होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये निभावण्यासाठी स्वातंत्र्य दिले होते. असे स्वातंत्र्य दिल्यामुळे ते अधिकारी आपल्या अधिकारात योग्य तो निर्णय घेत असत. वसंतराव एकदा स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्या कामात ढवळाढवळ करीत नसत.
वसंतरावांची उद्दिष्टे स्पष्ट व ठळक असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातून सहसा चूक होत नसे.