दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
मागच्या एका प्रकरणात आपण पाहिले की वसंतरावांना राजीनामा द्यावा लागला. त्यासाठी कारणीभूत झाले त्यांचे एका सभेतील भाषण.
किनवट येथे झालेल्या सभेत वसंतरावांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला जो निधी देते त्यात व इतर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कसे दुर्लक्ष करते हे सांगितले. हे भाषण विरोधीपक्षाच्या लोकांनी रेकॉर्ड करून इंदिराजींना ऐकविले. इंदिराजींना अत्यंत राग आला. त्यांना वसंतरावांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची संधी मिळाली.
याचे अजून एक कारण म्हणजे वसंतरावांच्या योजनांमुळे ते संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाले होते, हे काही लोकांना सलत होते. यासाठी विरोधी पक्षाचे लोक वसंतरावांच्या विरुद्ध होते. इंदिराजींनी वसंतरावांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.
वसंतरावांनी अत्यंत शांत चित्ताने आपला राजीनामा पाठवून दिला.
राजीनामा दिल्यावर त्यांनी त्यांचा वर्षा बंगला सोडला व ते पुसदला आले. त्यांना शेती जीव की प्राण होती, म्हणून त्यांनी आधुनिक शेतीवर भर दिला.
या घटनेनंतर चार महिन्यांनी २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली. निवडणुका स्थगित केल्या. अनेक विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात टाकले. समाज-माध्यमांवर बरेच निर्बंध आणले. हे सर्व लोकशाहीच्या विरुद्ध होते. यामुळे इंदिरा गांधींना विरोध होऊ लागला. हे लक्षात आल्यावर त्यांनी २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी समाप्त केली व त्याच वर्षी लोकसभेची निवडणूक घेण्यात आली.
काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये निश्चितपणे हरणार होता, कारण इंदिरा गांधींचे धोरण. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी वसंतरावांना निवडणूक लढण्यास सांगितले. वसंतरावांनी पक्ष श्रेष्ठींची ही आज्ञा शिरसावंद्य मानून वाशिम लोकसभा निवडणूक लढविली. संपूर्ण भारतात काँग्रेस पक्षाने मार खाल्ला, परंतु वाशिममध्ये मात्र वसंतराव भरघोस मतांनी निवडून आले. अर्थात या विजयाला जबाबदार होते त्यांचे मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी केलेले कार्य, जनतेचे प्रेम व विश्वास. ते एक खासदार झाले. यावेळी ‘जनता पक्ष’ निवडून आला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मोरारजी यांनी वसंतरावांना ‘उपराष्ट्रपती पद देऊ केले. इंदिरा गांधींनी वसंतरावांना बिहारचे ‘राज्यपाल’ पद स्वीकारा असा प्रस्ताव मांडला. पण वसंतरावांनी दोन्ही प्रस्ताव अतिशय सौजन्याने नाकारले. त्यांना सत्तेची, पदाची, अधिकाराची लालसा अजिबात नव्हती.
त्यांना खासदार म्हणून फक्त अडीच वर्षाचा काळ मिळाला. कारण १८ ऑगस्ट १९७८ रोजी त्यांचे सिंगापूर येथे दुःखद निधन झाले.