दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
प्राचार्य जयसिंग जाधव ( पातुर ) हे त्यांची एक आठवण सांगतात. एकदा ते व त्यांच्या काही मित्रांना एक प्राध्यापक न आल्यामुळे कॉलेजमध्ये मोकळा वेळ होता. ते सर्वजण एका झाडाखाली बांधलेल्या ओट्यावर बसले होते. कोणी वाचत होते, तर कोणी अभ्यास करीत होते, तर काही जण गप्पा मारत बसले होते. इतक्यात एका आलिशान गाडीतून वसंतराव नाईक व त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये आले. जयसिंग जाधव म्हणतात, “आम्ही वसंतरावांना गराडा घातला. कॉलेजमध्ये कोणाला माहीतच नव्हते की मुख्यमंत्री आले आहेत. ते व त्यांचा मुलगा अविनाश आमच्याबरोबर ओट्यावर येऊन बसले. मग आम्ही त्यांना म्हटले, तुमच्या लहानपणच्या काही आठवणी आम्हाला सांगा.” वसंतरावांनी त्यांच्या शालेय जीवनाची माहिती सांगायला सुरुवात केली. ते सांगत होते की शाळा लांब असल्यामुळे मी व माझा मोठा भाऊ घोड्यावरून शाळेत जात असू. कधी कधी घोडा आम्हाला पाडायचा. मग शाळेतून घरी येताना आम्हाला जंगलातून चालत यावे लागे. गहुलीत शिक्षणाची सोय नव्हती म्हणून मी व माझ्या भावाने वेगवेगळ्या गावी जाऊन शालेय शिक्षण पूर्ण केले. साधारणपणे सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. यावेळी भोरी, सुगरण, शिंपी हे पक्षी घरटी बांधून त्यात अंडी घालतात. भोरी हा पक्षी काटेरी झुडपात आपले घरटे (म्हणजे खोपा) बांधतो. गावातील काही मुले फासे टाकून या पक्ष्याची शिकार करतात हे आम्ही पाहिले होते. एकदा मी व माझ्या भावाने एक फासा तयार केला. भोरीच्या अंड्यावर तो पसरवून त्याची टोके एका फांदीला बांधली. हा उद्योग करून आम्ही दोघे शाळेत गेलो. शाळा सुटल्यावर परत येताना आम्ही पाहिले की एक भोरी पक्ष्याची मादी फाशात अडकली होती. जीवाच्या आकांताने ती त्यातून सुटण्यासाठी ओरडत होती. हे दृश्य पाहून मला अत्यंत वाईट वाटले. माझ्या भावानी व मी त्या पक्ष्याभोवती आवळलेला फास दूर केला. खरंतर तो पक्षी ओरडून दमून निपचित पडला होता. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर तो पक्षी होता. फास सैल केल्यावर त्या पक्ष्याने आमच्याकडे पाहिले व मग आकाशात भरारी घेतली. बंदीवानाला मुक्त केल्यामुळे आम्हाला आनंद झाला होता. खरं तर त्या पक्ष्याला अडकवण्याचा आम्हाला काय अधिकार होता? थोडक्यात सांगायचे झाले तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संदेश दिला की प्राणीमात्रांवर दया करा. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका.
असे हे मुख्यमंत्री की जे डामडौल न करता १८-१९ वर्षाच्या तरुणांबरोबर कॉलेजच्या पटांगणात एका साध्या सिमेंटच्या ओट्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारत होते. स्वतःच्या अनुभवावरून तरुणांना बहुमोल संदेश देत होते. वसंतरावांच्या मनात निसर्गप्रेम, शेतीविषयी प्रेम, निष्ठा व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी होती.
जयसिंग जाधव यांनी ‘वसंत - भूमिपुत्राचं देणं’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात - वसंतराव हे गोरगरिबांचे कैवारी होते. बंजारा समाजातील लोकांशी ते त्यांच्याच भाषेत बोलून त्यांच्या समस्या ऐकत असत. एकदा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान एका बंजारा माणसाने वसंतरावांना सांगितले,
“आमच्या झोपड्या गवताच्या आहेत. पावसाळ्यात त्या गळतात, तर उन्हाळ्यात त्यांना आग लागू शकते. आम्हाला आमच्या तांड्यामधल्या लोकांना घरे बांधून द्या.”
वसंतराव म्हणाले, “या मागणीचा मी जरूर विचार करीन.”
ते नेहमीच अगदी गरीब, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांशीसुद्धा आस्थेने बोलत असत, त्यांच्या समस्या जाणून घेत असत.
माजी आमदार जगाराव चव्हाण ( बीबी, तालुका लोणार ) यांची पण अशीच एक आठवण.
१९७२ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. ‘रोजगार हमी योजना’ वसंतरावांच्या संकल्पनेतून सुरू झाली होती. एक दिवस वसंतरावांनी एका दुष्काळी कामाला भेट दिली. सर्व मजूर त्यांच्या भोवती जमा झाले, पण एक मजूर मात्र आपले तोंड लपवून दूर उभा होता. वसंतरावांनी त्याला जवळ बोलावले. तो जवळ आल्यावर वसंतरावांनी त्याला ओळखले. तो एक मागासवर्गीय माजी आमदार होता. लोकांचे प्रतिनिधित्व केलेल्या एका माजी आमदाराला रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून काम करावे लागणे ही दुर्दैवाची गोष्ट होती. वसंतरावांनी त्याला पाचशे रुपये दिले व मग मुंबईला आल्यावर त्यांनी विधानसभेत ही घटना सांगितली.
त्याचबरोबर ‘माजी आमदारांना ‘निवृत्तीवेतन’ द्यावे’ असा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव एकमताने मान्य झाला व महाराष्ट्रात माजी आमदारांसाठी निवृत्तीवेतन योजना सुरू झाली. महाराष्ट्र हे पहिले राज्य, जिथे अशी योजना सुरू झाली. नंतर भारतातल्या सर्व राज्यांनी ही योजना लागू केली. ही आठवण माजी आमदार जगाराव चव्हाण यांनी एका लेखात लिहिली होती.
पंडितजी आणि पाईप -
एकदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मुंबईला आले होते. त्यांची प्रकृती फारशी ठीक नव्हती. ते राजभवनावर राहत होते. विजयालक्ष्मी पंडित या जवाहरलाल यांच्या भगिनी. त्या पण पंडितजींबरोबर होत्या. वसंतरावांनी त्या दोघांना आपल्या घरी वर्षा बंगल्यावर जेवायला यायचे निमंत्रण दिले. एका संध्याकाळी दोघेही वर्षा बंगल्यावर आले. जेवणे झाली व नंतर सर्वजण बंगल्याबाहेरील हिरवळीवर गप्पा मारायला बसले. वसंतरावांनी त्यांचा पाईप बाहेर काढून ओढायला सुरुवात केली. पंडितजी म्हणाले,
“नाईक साहेब, आपल्याला पाईप सोडावासा वाटत नाही का?”
यावर वसंतरावांनी उत्तर दिले,
“जी चीज सोडावी लागेल, ती मी कधीच स्वीकारत नाही.”
यावर पंडितजी मंद हसले. वसंतराव, आणि वत्सलाबाई पंडित नेहरूंना एअरपोर्टवर सोडायला गेले होते, पण ही त्यांची भेट शेवटची ठरली. आठ दिवसानंतरच पंडित नेहरूंचा मृत्यू झाला.