दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
वसंतरावांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, सर्वांना हवाहवासा वाटणारा. चेहऱ्यावर कायम मंद स्मित. त्यामुळे त्यांच्या निकट जे लोक येत ते त्यांचे मित्र होऊन जात. वसंतराव व त्यांचे मोठे भाऊ बाबासाहेब नाईक हे दोघे म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. बाबासाहेबांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. यवतमाळ जिल्ह्यात जुना पुसद तालुका मोठा होता. या दोघा भावांनी अनेक जिवाभावाची माणसे आयुष्यात जोडली. त्यातल्या काहींचे अनुभव असे:
लक्ष्मणराव जाधव - पहिलवान
मागच्या एका प्रकरणात लक्ष्मणराव जाधव यांच्याबद्दल लिहिले आहे. वसंतरावांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांची शक्ती शेतीत खर्च करायचे ठरविले व शेती करायला सुरुवात केली. वसंतरावांनी त्यांना उत्तम केळीचे बेणे आणून दिले. नंतर लक्ष्मणरावांच्या बागेत केळीचे विक्रमी उत्पादन आले. हे लक्ष्मणराव गरीब घरातले पण मनाने अत्यंत श्रीमंत माणूस. ते वसंतरावांचे सच्चे मित्र होते. एकदा लक्ष्मणराव कुस्ती जिंकले हे कळल्यावर वसंतराव त्यांच्या घरी गेले. लक्ष्मणरावांकडे बसायला खुर्ची सुद्धा नव्हती, तेव्हा वसंतराव ज्वारीच्या एका पोत्यावर सहजपणे बसले व त्यांनी लक्ष्मणरावांना शुभेच्छा दिल्या. वसंतराव मुख्यमंत्री झाल्यावर लक्ष्मणराव त्यांना भेटायला मुंबईला आले. वर्षा बंगल्यासमोर खूप मोठी रांग होती. लक्ष्मणराव रांगेत उभे राहिले. जेव्हा वसंतरावांनी त्यांना रांगेत उभे असलेले पाहिले तेव्हा ते स्वतः बंगल्याच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या या गरीब मित्राला कडकडून मिठी मारली. लक्ष्मणराव त्यांना म्हणत होते, “माझ्या कपड्यांवर केळीचे डाग पडले आहेत. तुमचे कपडे खराब होतील.” तेव्हा वसंतराव म्हणाले, ”मला शुभ्र स्वच्छ कपड्यांपेक्षा शेतात काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या लोकांचे डाग पडलेले कपडे जास्त आवडतात.” ही भेट म्हणजे कृष्ण व सुदामा यांचीच भेट. नंतर वसंतराव त्यांना बंगल्यात घेऊन गेले व त्यांनी त्यांची प्रेमाने चौकशी केली.
डॉ. एन. पी. हिराणी -
एन. पी. हिराणी हे पुसद परिसरातील पहिले डॉक्टर. ते अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे ‘शिया इमामी इस्माईल समाजा’तले. ते जेव्हा डॉक्टर झाले, तेव्हा त्यांचे वडील त्यांना घेऊन वसंतरावांच्या बंगल्यावर आले.
वसंतरावांनी विचारले, “आता कुठे प्रॅक्टिस सुरू करणार ?” डॉक्टर हिराणी म्हणाले, “नांदेडला. माझ्या ओळखी नाहीत तेथे , पण हळूहळू जम बसेल.” हे ऐकून वसंतरावांनी डॉक्टर हिराणीना नांदेड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त केले. अर्थात डॉक्टर हिराणी यांच्या आई-वडिलांना वाटत होते की आपल्या मुलाने पुसदला दवाखाना सुरू करावा. शेवटी डॉक्टर हिराणी यांनी पुसदला दवाखाना सुरू केला.
नंतर १९७३ मध्ये एक दिवस डॉक्टर हिराणी दवाखान्यात बसलेले असताना, वसंतरावांनी त्यांना फोन करून आश्चर्याचा गोड धक्का दिला. वसंतराव म्हणाले,
“डॉक्टर हिराणी, आज तुमचे धर्मगुरू हिज हायनेस प्रिन्स आगाखान हे मुंबईला येणार आहेत. त्यांना मी ताजमहाल हॉटेलमध्ये निमंत्रित केले आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन यावेळी ताजमहल हॉटेलमध्ये या.”
एवढेच नाही तर वसंतरावांनी डॉक्टर हिराणी यांच्या येण्याची संपूर्ण सोयसुद्धा केली. आगाखान साहेबांना वसंतराव म्हणाले, “तुमच्या समाजातील हा मुलगा डॉक्टर झाला आहे. तुम्ही याच्याबरोबर फोटो काढा.” डॉ. हिराणी अत्यंत भाग्यवान ठरले.
विदर्भातील नेते श्री. दा. पवार -
एकदा स्वतंत्र विदर्भातील नेते श्री. दा. पवार आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण करण्यास वसंतरावांच्या घरी आले. पवारांनी नाईक साहेबांच्या हातात अक्षता दिल्या व आमंत्रण केले. नाईक साहेबांनी आमंत्रण स्वीकारले, पण अक्षता परत भांड्यात टाकल्या. यावर पवार म्हणाले,
”हे काय, तुम्ही अक्षता परत ठेवल्यात म्हणजे तुम्ही लग्नाला येणार नाही का?”
वसंतराव म्हणाले, “मी लग्नाला येणारच आहे, पण या अश्या अक्षता तुम्ही प्रत्येकाला दिल्यात तर किती तांदूळ फुकट जाईल. माझ्या शेतकऱ्याने प्रत्येक तांदुळाचा दाणा पिकवायला खूप मेहनत केली आहे. शिवाय लग्नात पण नवीन दांपत्यावर आपण अक्षता टाकतो. पण त्या पायाखाली तुडवल्या जातात. हे मला तरी योग्य वाटत नाही. फक्त आई-वडिलांनी अक्षता टाकाव्यात व बाकीच्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत.”
यावरून कळते की वसंतराव लहान सहान गोष्टींचा पण विचार करायचे. हा त्यांचा विचार तर स्तुत्यच आहे. ते नेहमी आपल्या शेतकरी बांधवांचा, त्यांच्या कष्टांचा विचार करीत असत.
किसनराव राठोड -
औरंगाबाद जवळ राहणारा एक अशिक्षित माणूस किसनराव राठोड. त्याला राजकारणाची उत्तम जाण होती. नाईक साहेबांचा तो जिवाभावाचा कार्यकर्ता होता. एकदा तो नाईक साहेबांना भेटायला मंत्रालयात गेला आणि ते त्याचे जे काम होते ते झाले. ते झाल्यावर तो निघाला, तेव्हा वसंतरावांनी त्याला थांबवून सांगितले,
“तुमच्या परिसरात शाळा कॉलेज नाही. ते सुरू करा. सर्व व्यवस्था मी करतो.”
नुसते असे बोलून ते थांबले नाहीत तर योग्य त्या सर्व गोष्टी करून त्यांनी औरंगाबाद जवळ शाळा व कॉलेज सुरू करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली. वसंतरावांना शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था होती. ‘आदिवासी वंचित समाजातील मुले शिकली तरच त्यांची प्रगती होईल व पर्यायाने देशाचीही प्रगती होईल’ असे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर आदिवासी वंचित समाजासाठी ‘आश्रम शाळा’ सुरू केल्या.
भाऊराव पाटील ( सेलू बुद्रुक ) -
वसंतराव नाईकांची पुसदजवळ सहा किलोमीटर अंतरावर सेलू बुद्रुक येथे शेतजमीन होती. पुसदला गेल्यावर वसंतराव शेतावर गेल्याशिवाय राहत नसत. तेथे ते स्वतः काम करीत, जमीन नांगरून पेरणी करीत. हायब्रीड ज्वारीचे पीक त्यांनी त्यांच्या शेतात प्रथम काढले व लोकांना प्रेरणा दिली.
वसंतराव जेव्हा पुसदला वकिली करीत होते तेव्हा (म्हणजे १९४३ साली) पुसदला कॉलऱ्याची साथ आली. कॉलरा झाल्यामुळे लोक मृत्युमुखी पडत होते, पण ते औषध घ्यायला तयार नव्हते. लोकांना तो रोग मरीआईच्या कोपामुळे झाला असे वाटत असे. यावेळी नाईक साहेब स्वतः सर्व गोरगरिबांच्या घरी गेले व त्यांनी लोकांना औषध घ्यायला लावले. त्यांचा जीव नेहमीच गोरगरिबांसाठी तीळ तीळ तुटत असे. ही आठवण भाऊराव पाटील सांगतात. ते म्हणतात, “त्यावेळी मी चौथी शिकणारा विद्यार्थी होतो.”
वसंतराव गावातल्या जत्रेलासुद्धा जायचे व तेथे लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवायचे. ‘दारू पिणे कसे वाईट आहे, त्यामुळे माणसाच्या आयुष्याचे वाटोळे होते, घरदार उध्वस्त होते’ हे ते शांतपणाने लोकांना त्यांच्या भाषेत (म्हणजे बंजारा भाषेत) समजावून सांगायचे. गावातील व तांड्यातील लोक त्यांना देव मानत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा परिणाम लोकांवर होत असे. वसंतरावांच्या या प्रयत्नांमुळे हळूहळू बंजारा जमातीमध्ये प्रगती होऊ लागली, सुधारणा होऊ लागली. मुले शिकू लागली व दारूचे व्यसन हळूहळू कमी होऊ लागले.
नारायण अंभोरे पाटील ( बोरगडी पुसद ) -
नारायण अंभोरे पाटील हे बोरगडी येथे राहणारे. ते सांगतात,
“आमचे गाव बोरगडी दोन ओढ्यांच्या संगमावर वसलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात तेथे पूर यायचा, घरे दारे नष्ट व्हायची, सगळे वाहून जायचे. शेतकऱ्यांना सरकारकडून काही मदत मिळत नसे. एकदा सर्व गावकऱ्यांनी वसंतरावांची भेट घेतली व त्यांना त्यांची ही समस्या सांगितली. दुसरे दिवशी वसंतराव स्वतः बोरगडीला आले. मोटारीचा रस्ता नव्हता म्हणून त्यांना थोडे अंतर चिखलातून जावे लागले. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी गावाची दुरावस्था पाहिली. त्यांनी काही अंतरावर ओढ्यापासून दूर एका शेतकऱ्याकडून पाच एकर जमीन विकत घेतली व बोरगडीच्या लोकांसाठी तेथे घरे उभारली. यामुळे बोरगडीचे लोक वसंतरावांना कधीही विसरू शकणार नाहीत. एवढेच नाही तर जेव्हा १९७२ ला दुष्काळ पडला तेव्हा वसंतरावांच्या प्रेरणेने ‘रोजगार हमी योजना’ सुरू झाली. शेतकऱ्यांचा रोजच्या जेवणाचा प्रश्न मिटला. शेतमजुरांना कामावर असताना मक्याची भाकरी मिळत असे. त्या भाकरीची चव वसंतरावांनी स्वतः घेऊन पाहिली. ते म्हणत “माझा शेतकरी बांधव सुखी असला पाहिजे. त्याला शक्ती मिळेल असे खाणे मिळाले पाहिजे.”
एवढी तळमळ त्यांना शेतकऱ्यांविषयी होती.
ताराबाई राठोड -
ताराबाई राठोड या बेलोरासारख्या पुसद तालुक्यातील एका टोकाच्या गावात राहणाऱ्या कार्यकर्त्या. त्यांच्या मनात बंजारा समाजातील लोकांबद्दल कायम तळमळ असायची. खरंतर बेलोरा गाव अतिदुर्गम ठिकाणी होते. पण त्या कायम नाईक कुटुंबीयांच्या पाठी असायच्या. नाईक कुटुंबांना त्यांचा मोठा आधार होता. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व मनोहर नाईक यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्या हिरीरीने प्रचार करायच्या. त्यांचे स्वतःचे जीवन अत्यंत संघर्षाचे होते. पण त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्या समाजाच्या हितासाठी झटायच्या. त्यांनी वसंतरावांना सांगून अनेक गरीब तरुणांना नोकरी मिळवून दिली. त्या अत्यंत स्पष्ट, पण परखड बोलणाऱ्या होत्या. त्यांच्या बोलण्यात नेहमीच तथ्य असायचे. म्हणूनच वसंतरावांच्या घरी त्यांच्या बोलण्याला महत्त्व होते. त्यांच्या प्रयत्नामुळे बेलोरा व आसपासच्या गावात अनेक विकासाची कामे झाली. त्या बेलोरा ग्रामपंचायतीच्या ३५ वर्षे सदस्या होत्या. ग्रामीण भागातल्या अत्यंत उत्साही, कणखर व धैर्यवान अश्या या ताराबाई. कोणतीही समस्या असो, त्यांच्याकडे समस्या घेऊन कोणी गेले की त्या सर्व काही नीट ऐकून घेत. नंतर वसंतरावांच्या बंगल्यावर जाऊन त्या सर्व अडचणी त्यांना सांगत व अर्थातच त्यावर उपाय योजत.